Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंची वक्तव्ये प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नाहीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यांना पाच वर्षे सरकार चालवायचं आहे. त्यांनी ते जरूर चालवाव आमची काही आडकाठी नाही. मात्रमहाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा खिमा करू अशी भांडणं नाक्यावर होतात. असं बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कारण चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात फार काळ टिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी शब्द संयमाने आणि जपून वापरावे असा इशारा देत त्यांची वक्तव्ये ही प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

महाविकास आघाडी सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह प्रवक्ते केशव उपाध्ये, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री या पदाचा मान राखायला हवा. त्यांना माझा सल्ला आहे की मुख्यमंत्र्यांसारखे वागा. पदाला साजेसा संयम ठेवा आणि तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीत विकासावर चर्चा झालीच नाही. संपूर्ण मुलाखत टीका टिपण्णीमध्ये गेली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारी ती वक्तव्यं नव्हती. माझं असं प्रामाणिक मत आहे की उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष नक्की राज्य चालवावे पण नुसत्या धमक्या नकोत. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणा असा टोलाही त्यांनी लगावला.

गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार विरूद्ध कंगना राणाउत आणि अर्णब गोस्वामी असा संघर्ष राज्यातील जनतेला पाहायला मिळतो आहे. या दोन्ही प्रकरणात सर्वोच्च आणि उच्च न्यायलयाने सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यांची गळचेपी आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर अशा प्रकारची निरिक्षणे न्यायालयाने या दोन प्रकरणांबाबत नोंदवली आहेत. कंगना राणौत, अर्णब गोस्वामींच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सरकारविरोधी विचार मांडणाऱ्यांना चिरडून टाकू या ठाकरे सरकारच्या विचाराशी तर आम्ही बिलकूलच सहमत नाही. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला चपराक लगावल्यानंतर आता तरी हे सरकार सुधारणार आहे का? की आता या न्यायालयांनाच तुम्ही महाराष्ट्रविरोधी ठरवणार आहात? हे सवाल आता विचारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या दोन न्यायालयांना सरकारने महाराष्ट्रविरोधी ठरवलं नाही तरी खूप झालं असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

अर्णब गोस्वामी प्रकरणात न्यायालयाने सरकारला चपराक लगावली आहे. सरकारी यंत्रणेसाठी अडचणीची ठरणारी मते अर्णब यांनी टीव्हीवर नोंदवल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले. कायदा कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी वापरायचा नसतो असं निरिक्षण न्यायलायने नोंदवले आहे. कंगना राणौत प्रकरणातही मुंबई पालिका प्रशासन, राज्य सरकार आणि त्यांचे नेते यांच्यावर न्यायलायने टीका केली आहे. तिच्या कार्यालयावर केलेली टीका अप्रामाणिक होती. त्यामागचा हेतु चांगला नव्हता. ती कारवाई अनधिकृत स्वरूपाची होती असंही न्यायालयाने म्हटलं आहे. या दोन्ही प्रकरणात सरकारी तंत्राचा गैरवापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा कधीही कुणाच्या घरच्यांवर टीका टिपण्णी करत नाहीत. तसे करण्याची आम्हाला गरज  नाही. मात्र शिवसेनेचे नेते माझ्या पत्नीविषयी अधिकृतरित्या समाज माध्यमावर काय काय टिपण्णी करतात हे आपण सर्वांनी पाह्यलं आहे. मात्र त्याचे भांडवल करत नसल्याचे सांगत मी राजकारणात असल्याने त्याकडे फारसे गांभीर्यानेही घेत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदूत्व हे धोतर आहे का? या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्यांच्या अनुषंगाने बोलताना फडणवीस बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री हिंदूत्वाला धोतर म्हणतात. काय ही भाषा हिंदूत्व हे धमण्यांमध्ये असतं असे सांगत तुमच्या धमण्यांमध्ये हिंदूत्व असतं तर तुम्ही स्वा, सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मांडीला मांडी लावून बसला नसता अशी टीका त्यांनी केली.

वीज बिलात सवलत देणार असल्याची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत बोलणे गरजेचे असताना मुख्यमंत्री त्याबाबत आता घुमजाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच तिन्ही पक्षाचे सरकार असले तरी या सरकारचा फायदा स्वत:चा पक्ष वाढीसाठी कसा करून घ्यायचा याची चांगली जाण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चांगलीच आहे. हे सरकार विश्वासघातान आलेले सरकार असून यामुळे सर्वाधिक नुकसान राज्याचे झाल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *