Breaking News

मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सुचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खुप चांगली माहिती मिळाली आहे. ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खुप चांगल्याप्रकारे उपयोग करून घेत आहात. व्हॉटसअप ग्रुप निर्माण करत त्याद्वारे माहितीची देवाण घेवाण करत आहात, जनजागृती करत आहात. ही कामे खरच खुप कौतुकास्पद असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सरपंचांच्या बैठकीत काढले.

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून तसेच वासुदेव, वाघ्या- मुरळी यांच्या माध्यमातून गावात कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करावी, दवंडीचा उपयोग करावा अशी सूचना करत कोरोनाची तिसरी लाट गावात येणार की नाही हे कोरोनाला न ठरवू देता गावांनी यासंबंधीचा निर्णय घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, सततची सावधानता बाळगत नियमांचे पालन करावे आणि आपली गावे कोरोनामुक्त ठेवावीत असे आवाहन त्यांनी सरपंचांना केले.

या संवादादरम्यान उपस्थित सरपंचांनी त्यांच्या कोरोनामुक्त गावाच्या वाटचालीची माहिती देत केलेले प्रयत्न, उपाययोजना आणि राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील १९ जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब ज-हाड यांच्यासह राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

लसीमुळे घातकता कमी

त्यांनी लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र शासनाने घेतली असल्याचे सांगतांना जस जसे लसीचे डोस उपलब्ध होतील त्याप्रमाणे लस उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती दिली. लस घेतल्यास कोरोना होत नाही असे नाही. परंतु घातकता कमी होते हे स्पष्ट करतांना मुख्यमंत्र्यांनी गावातील नागरिकांना लस घेण्यासाठी सरपंच करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.  तुम्ही सावधपणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत पुढे चालत राहा, तुमच्या कोरोनामुक्त गावाच्या चळवळीला ताकद देण्याचे तसेच तुमच्या प्रत्येक पाऊलासोबत तुमच्यासोबत राहण्याचे काम शासन करील अशी ग्वाहीही यानिमित्ताने दिली.

वस्तीनिहाय समुह तयार करा

मुख्यमंत्र्यांनी लोकसंख्येनुसार वस्तीनिहाय टीम तयार करा, या टीमने ती वस्ती सांभाळावी, तिथल्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले. शासनाने मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा वाढवल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे असले तरी कुणालाही या रुग्णालयात येण्याची गरज पडूच नये, इतके लोक आरोग्यसंपन्न रहावेत, असे झाल्यास हा खरा विकास आहे हेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामविकास मंत्र्यांकडून गावे कोरोनामुक्त करण्याचा विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गावे कोरोनामुक्त करू असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी १४ व्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक सुविधांसाठी ग्रामपंचायतींना मोठ्याप्रमाणात निधी दिल्याची माहिती दिली. कोरोना मुक्त गावाची स्पर्धा ही स्पर्धा न रहाता लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली

कोरोनामुक्त गावाची संकल्पना लोकमनात रुजवली

गावखेड्याचा आढावा घेऊन कोरानामुक्त गावाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी लोकमनात रुजवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, यासाठी राज्यातील गावे खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानातील जबाबदारी ओळखून गावे आपल्या गाव कुटुंबाची काळजी घेत आहेत. यावेळी टास्कफोर्स चे प्रमुख डॉ संजय ओक आणि पोपटराव पवार यांनी ही मार्गदर्शन केले.

या गावाच्या सरंपंचांनी साधला मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

औरंगाबाद विभाग जिल्हानिहाय (कंसात तालुका) : औरंगाबाद – कुंभेफळ (औरंगाबाद). बीड – लुखेगांव (माजलगाव). जालना – रांजणी (घनसांवगी), जयपूर (मंठा). उस्मानाबाद –शिंगोली (ता. उस्मानाबाद). नांदेड – भोसी (भोकर). लातूर – सिकंदरपूर (लातूर), अलमला (औसा). परभणी – खडगाव (गंगाखेड). हिंगोली – मेठा (औंढा-नागनाथ).

नागपूर विभाग : भंडारा –शहापूर (भंडारा). चंद्रपूर – जाम तकुम (पोंभुर्णा), राजगड (मुल). गोंदिया – करंजी (आमगाव). नागपूर – पिंपळगाव (हिंगणा), शिरपूर (नागपूर ग्रामीण).

अमरावती विभाग : अकोला – कापसी रोड (अकोला). अमरावती – धामणगाव बधे (मोताळा). यवतमाळ – अकोला बाजार (यवतमाळ), खडका (महागाव). वाशिम – गोवर्धन (ता. रिसोड).

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *