Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली हात जोडून ही विनंती गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका…राजकिय पोळ्या भाजू नका

मुंबई: प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिली.

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली.

राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना केले.

आज एसटी कर्मचाऱ्यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. परंतु पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने पडळकर यांना ताब्यात घेण्यासाठी आकाशवाणी आमदार निवासात गेले. परंतु तेथे आधीच एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत तेथे ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे पोलिसांना पडळकर यांना ताब्यात घेता आले नाही. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *