Breaking News

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू , जबाबदार कोण? मंत्री कार्यालय कि गुच्छ अधिकाऱ्यांमधल्या नेत्याप्रती निष्ठा आणि स्पर्धेचा पहिला बळी

मुंबई: विशेष प्रतिनिधी
एकाबाजूला राज्यातील जनता कोरोना आजारावर विजय मिळण्यासाठी राज्य सरकारला साथ देत आहे. तर दुसऱ्याबाजूला मर्जीतील व्यक्तींची खास पदावर नियुक्ती करण्याच्या आणि नियुक्तीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्याच्या पध्दतीमुळे एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुख:द घटना पुणे येथे घडली. त्यामुळे मंत्रालय आणि इतर शासकिय अधिकाऱ्याकडून याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाबाधीत रूग्ण सापडल्याने मंत्रालय बंद ठेवण्याची पाळी राज्य सरकारवर आली होती. या कालावधीत गुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांना हवे असलेल्या पदावर वर्णी लावता यावी यासाठी मंत्रालय बंद असताना ६९ अधिकाऱ्यांच्या पोस्टींगच्या ऑर्डर काढण्यात आल्या. यात सहा महिन्यापूर्वी पुणे जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळातील अतिवजनदार मंत्र्याच्या कार्यालयाने शिफारस केलेल्या विजयसिंग देशमुख यांची नियुक्त करण्यात आली.
गायकवाड हे मवाळ आणि कामाशी प्रमाणिक स्वभावाचे म्हणून महसूल विभागाला परिचित आहेत. मात्र याच पदावर राज्य मंत्रिमंडळातील एका अतिवजनदार मंत्र्यांना त्यांच्या मर्जीतील व्यक्ती हवा होता. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातील मात्र त्या अतिवजनदार मंत्र्याच्या लेखी काडीचीही किंमत नसलेल्या व्यक्तींनी एका पदोन्नती झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याची गायकवाड यांच्या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
त्यानुसार मंत्रालय बंद असण्याच्या कालावधीत महसूल विभागाचे उपसचिव माधव वीर यांनी त्या ६९ पदोन्नती अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश काढले. त्यात साहेबराव गायकवाड यांच्या पुण्यातील कार्यकालास अवघे सहा महिने पूर्ण होत आलेले असतानाच त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली करण्यात आली. वास्तविक पाहता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची बदली करावयाची असेल तर त्यास त्या ठिकाणी तीन वर्षे ते किमान सहा वर्षे पूर्ण झालेली असायला हवीत. परंतु या नियमाचा विसर पडलेल्या महसूल विभागाने मंत्री कार्यालयाच्या सांगण्यावरून बदली केल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या पदावर नव्याने नियुक्त झालेले विजयसिंग देशमुख यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पुणे येथे जावून अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा पदभारही स्विकारला. महसूल विभागाच्या या अन्यायाविरोधात साहेबराव गायकवाड यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली. त्यावर मॅटने तातडीने सुणावनी घेत ५ मे २०२० रोजी आदेश देत गायकवाड यांना पुन्हा आहे त्याच ठिकाणी पदभार द्यावा असे आदेश प्रशासनाला दिले.
मात्र दरम्यानच्या काळात या अतिवजनदार मंत्र्याच्या कार्यालयातील किंमत नसलेल्या अधिकाऱ्यांकडून साहेबराव गायकवाड यांच्यावर मॅटमध्ये दाखल केलेली याचिका मागे घे, तु पिंपरी-चिंचवड महापालिकेत रूजू हो, पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोड यासाठी सातत्याने दबाव आणण्यात येत होता. गुरूवारी सकाळी त्यांना पुन्हा या मंत्री कार्यालयातील व्यक्तींकडून फोन गेल्याने त्यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पुणे येथील जहांगीर रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही. त्यामुळे साहेबराव गायकवाड यांच्या मृत्यूस जबाबदार कोण असा सवाल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत असून महसूलचा गुच्छ कि मंत्र्यांची मर्जी राखण्याची पध्दत नेमके कोणाला जबाबदार धरायचे अशी भावनिक विचारणाही केली जात आहे.
याबाबत महसूल विभागाचे उपसचिव माधव वीर यांना मॅटने दिलेल्या आदेशासंदर्भात विचारण्यासाठी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

 

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …