Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपत्तीग्रस्तांना धीर देत म्हणाले…. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल

अक्कलकोट : प्रतिनिधी

आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने २२ आणि २३ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.

आस्थेवाईकपणे चौकशी

रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल २४ तास झाडावर आणि पाण्यात होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

आपत्तीग्रस्तांना धनादेशाचे वाटप

यावेळी आपत्तीग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले. त्यानंतर बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील ५० टक्के रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने ४० घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही मरोड यांनी दिली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, जि.प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, आदींसह परिसरातील आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

प्राथमिक पातळीवर अर्थसहाय्य करण्यास सुरुवात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (सोलापूर)

केवळ काहीतरी घोषणा करणार नाही. जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबाना अर्थसहाय्य करणे आम्ही सुरु केले आहे. अजून परतीचा पाऊस पूर्ण गेलेला नाही. वेधशाळेने पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. हे संकट टळलेले नाही. धोक्याचा इशारा आहे, मात्र पंचनामे सुरु झाले असून ते पुर्ण झाल्यावर संपूर्ण माहिती येताच प्रत्यक्ष मदत केली जाणार आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

जे जे काही करता येणे शक्य व आवश्यक आहे ते सगळं केल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या संकट संपलेले नाही. प्राणहानी होऊ देऊ नका अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे, शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. राजकारणाचा चिखल उडवू नये असा टोला भाजपा आणि विरोधकांना त्यांनी लगावला.

पावसाची ही परिस्थिती आत्ताच, आजच कळली असे नाही. आम्ही सातत्याने याची माहिती घेत होतो आणि प्रशासनही संपर्कात होते.  उद्या आणि परवाही मी पूरग्रस्त भागात फिरणार आहे. यापूर्वीही निसर्ग चक्रीवादळ येऊन गेले, पूर्व विदर्भात पूर आला , त्यावेळीही मदत केली. शुक्रवारी पंतप्रधानांचा सुध्दा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही. पाऊस विचित्र पडतोय. एका ७२ वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *