Breaking News

पाकिस्तानी म्हणणे, ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण; हे चालू देणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विरोधकांना धोबी पछाड

मुंबईः विशेष प्रतिनिधी

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी माओवादी म्हणणं, आणि केवळ हक्कभंग आणला म्हणून ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण असून अशा पध्दतीचे राजकारण महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत तसेच कोणीही उठावं आम्हाला टपली मारून जावे या गोष्टीही चालू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

तुम्ही महाराष्ट्र द्रोही नाहीत. केवळ विरोधाला विरोध करायचा हे थांबवायला हंव अशी सूचनाही त्यांनी यावेळी विरोधकांना केली.

आगामी काही वर्षात राज्यातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक ठेवा जपला जाणार आहे. यात तुमच्या काही सूचना असतील तर त्या जरूर कराव्यात त्याचे आम्ही स्वागत करू असे सांगत यामुळे किमान आम्हाला कोणी हिंदूत्व सोडलं अशी टीका करणार नसल्याचा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

विरोधी पक्षनेते हे मोठा विचार करतात. ते संपूर्ण देशाचा विचार करतात. त्यामुळे त्यांनी दिल्लीत खरेच जावे तिथला माणूस फक्त ठराविकच विचार करतोय म्हणून आमचा विरोध करतोय. तुम्ही गेलात आम्ही तुमचा विचार करू असे सांगत फडणवीसांनी दिल्लीत जाव अशी सुधीर मुनगंटीवारांचीही खरी इच्छा असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलीय. न्यायालयात काय निर्णय लागायचा तो लागेल. उच्च न्यायालयात जिंकलो, पण सर्वोच्च न्यायालयात आता लढाई सुरु आहे. मागच्या सरकारने तयार केलेल्या वकिलांच्या टिममध्ये कोणताही बदल केला नाही. ही आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही. मात्र मध्येच कोणीतरी टुमणं काढलंय कि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार. परंतु मी परत सांगतोय कि ओबीसी आणि कोणाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावणार नाही. आम्ही महाजनांचा विचार करत असल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपातील हवा त्यांनी काढून घेतली.

मागील वर्षभरात आम्ही केलेल्या कामाची पुस्तिका विरोधी पक्षनेत्यांनी वाचली ही चांगली गोष्ट आहे. मागील पाच वर्षात लोकांच्या कुंडल्या आहेत असे सांगत कुंडल्या वाचणारे अहवाल, प्रगती पुस्तक वाचतायतही खरच चांगली गोष्ट असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

दोन दिवसाचे अधिवेशन घेण्यावरून विरोधकांकडून टीका केली जातेय. मात्र कोरोनाचा  धोका अजून टळलेला नाही. मुनगंटीवार जी तुम्ही म्हणाले की कोरोनाने तुमच्या कानात येवून सांगितले का, मात्र कोरोनाचा मास्क आपण नाकाला लावतो कानाला नाही. त्यामुळे कोरोना नाकात बोलतो असा टोलाही त्यांनी सुधीर मुनगंटावारांना लगावला.

याशिवाय महाराष्ट्रातील कोरोनाला रोखण्यासाठी ज्या काही गोष्ट केल्या त्या गोष्टी डब्लूएचओला कळली जी गोष्ट वॉशिंग्टन पोस्टला कळली ती अजून आपल्याला धारावी बाबत कळली नसल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली.

व्हॅक्सीनचा पत्ता नाही तोपर्यंत मास्क लावणे, हात धुणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आम्ही तर हात धुतोच मात्र कोणी हात धुवून मागे लागायचा कि कसे ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  तुम्ही विरोधात आहात त्यामुळे आरोप करणे तुमचे काम आहे. आरोप करा पण आम्ही कोरोना पॉझिटीव्ह नसलो तरी आम्ही पॉझिटीव्हली ते घेतो. केंद्राच्या कोणतीही मार्गदर्शक तत्वे नसताना आपण अद्यावत कोविड सेंटर सुरु केली, डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. या चांगल्या गोष्टी दिसल्या विरोधकांना दिसल्या नाहीत का. असा सवाल करत महाराष्ट्रात कोरोनावर थोडे तरी नियंत्रण ठेवले याचे सारे श्रेय सर्व जाती धर्मियांचे असल्याचे ते म्हणाले.

कांजूर मार्ग कारशेडबाबतचा विषय सध्या न्यायालयात सुरु आहे. जसे तुमच्याकडे कागदपत्रे आहेत. तशी यासंदर्भात तुमच्या मंत्र्यांच्या सह्यांची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. प्रकल्पाच्या जमिनीवर मालकी कोणाची यापेक्षा प्रकल्प कोणासाठी हे महत्वाचे आहे. तसेच मुंबईकरांसाठी होत असताना त्याच्या विकासात मीठाचा खडा टाकू नका असे इशारा देतानाच प्रकल्प असल्यानंतर त्याला विरोध हा होत असतोच. त्याच्यावर मात करून करायची असते. मुंबईतून जाणारी बुलेट ट्रेन कोणी मागितली होती ? त्याचा फायदा महाराष्ट्राला किती होणार ? राज्याच्या हिश्याला फक्त चार स्टेशने आली आहेत. मुंबईतून किती जण अहमदाबादला जाणार ? याचा खरा फायदा कोणाला होणार ? हे जग जाहीर आहे. तरीही या प्रकल्पासाठी मुंबईतली ऐन मोक्याची जागा केंद्राला महाराष्ट्राने दिलीच ना अशी उपरोधिक टीका ही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर केली.

त्यामुळे मुंबईच्या राज्याच्या हिताच्या आड आपलं राजकारण यायला नको. त्यात मिठाचा खडा टाकू नका. मेट्रोचा खर्च किती वाढला ते बाहेर येणारच आहे. निसर्गाचा ऱ्हास करून विकास करायचा नाही. तो मला मान्य नसल्याचे सांगत कांजूर मार्गलाच मेट्रो कार शेड होणारच असे अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुणावले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *