Breaking News

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली.

गेल्या ३/४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजविला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तो मदतीसाठी आर्जव करीत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, मराठवाड्यातील अतिवृष्टी यापैकी एकाही प्रसंगात राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी राहिले नाही. आता पुन्हा परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पीकांना कोंब फुटली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, परळी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकर्‍यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी स्थिती आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे. मदतीसाठी आर्जव करीत आहे आणि जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे तरी कसे, असा त्याचा प्रश्न आहे. जवळपास अशीच स्थिती विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. भंडारा-गडचिरोली-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भातपीकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर जवळपास १०-१२ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. धान, सोयाबीन अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब आणि कपाशीला बुरशी म्हणजे कोणतेच पीक हाती नाही. ज्वारी सुद्धा मातीमोल झाल्याची व्यथा त्यांनी मांडली.

कोकणातील जिल्हे आणि पालघरमध्ये भातपीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धान कापले तरी संकट आणि नाही कापले तरी संकट, अशी इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. सातत्याने होणारे नुकसान, त्यात कोणत्याही प्रसंगात मदत न मिळणे, यामुळे अतिशय गंभीर प्रश्न शेतकर्‍यांपुढे उपस्थित झाले आहेत. अनेक जिल्ह्यात पूर्वीच्याच पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाई अजून मिळाली नाही. सातत्याने विनंती करूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर २५ आणि ५० हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरून तर शेतकर्‍यांना आणखी वेदना होत आहेत. मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकर्‍याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *