Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेची घोर निराशा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादातून सामान्य जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही. कोरोनाला अटकाव कसा घालणार, मिशन बिगीन अगेनची नेमकी कशी अंमलबजावणी करणार, राज्याचे उद्योग चक्र गतिमान कसे करणार, याची उत्तरे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून मिळाली नाहीत, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

राज्यात कोरोनाचे संकट अतिशय भीषण स्वरूप धारण करत चालले आहे. पुण्यासारख्या शहरात ऑक्सिजनच्या अभावी अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. उपचारासाठी सुरु केलेल्या जम्बो उपचार केंद्रातील सावळा गोंधळ रुग्णांच्या जीवावर उठला आहे. अशा स्थितीत माननीय मुख्यमंत्री राज्यातील कोरोना अटकावासंदर्भात काही निश्चित धोरण जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी कोरोनापासून कशी काळजी घ्यावी याची प्राथमिक माहिती देण्यात धन्यता मानली.  कोरोना पासून बचाव करण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा विविध पद्धतीने काळजी घेतो आहे. त्यापेक्षा सरकारी पातळीवर आरोग्य यंत्रणेद्वारे प्रभावी उपायोजना कशी करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अपेक्षित होते. तसे न करता मुख्यमंत्री उपदेशाचे निरर्थक डोस पाजत बसल्याने सामान्य माणसाची निराशा झाल्याची टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून राज्याचे अर्थचक्र गतिमान होण्यासाठी ठोस घोषणा होतील अशीही अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतही स्पष्ट दिशादर्शन केले नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना काय काळजी घ्या, घरात जेवताना खाद्यपदार्थ मोठ्या बाऊलमध्ये घ्या, बंद जागेत भेटू नका यासारख्या प्राथमिक सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एवढ्या सूचना द्यायच्या होत्या तर त्यासाठी वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या असत्या तरी चालले असते, तेवढ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे कष्ट का घेतले, आपला मौल्यवान वेळ नाहक खर्च का केला असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *