Breaking News

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.

दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने आज या सुविधेचे उद्घाटन झाले. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री ॲङ अनिल परब, सार्वजनिक आरोग्य मंत्री  राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबतच खासदार विनायक राऊत सहभागी झाले. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने,  आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांचीही उपस्थिती होती.

कोकणाला लाटांचा सामना कसा करायचा ते शिकवण्याची गरज नाही पण कोरोनाबाबत दुसरी लाट न येवू देणे ही प्राथमिकता आहे.  कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करुन चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर देखील कमी होईल, असे ते म्हणाले. ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत रत्नागिरीत झालेले काम कौतुकास्पद आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याच पद्धतीने आगामी काळात जाणीव जागृती करुन कोरोनाचा घसरता आकडा आणखी कमी करा. युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊन की मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता याबाबत प्रत्येकापर्यंत जागृती करा.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर याबाबत चित्रफित दाखविण्यात आली.

इतर रोगांमध्येही फायदा

 प्लाझमा अफेसेसिस युनिट मलेरिया, डेंग्यू तसेच इतरही अनेक आजारात मदत करणार आहे. यासाठी लागणारी यंत्रे १ ते २ लाखात येतील ती खरेदी करुन यातून कायमस्वरुपी उपचार व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले. रत्नागिरीत घराघरापर्यत पोहोचून आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासनाने उत्तम कामगिरी केली याबद्दल त्यांनी अभिनंदन देखील यावेळी केले.

 मुख्यमंत्र्यांचे आभार

जिल्हयाला आरटीपीसीआर प्रयोग  शाळेची आवश्यकता आहे असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यांच्याच संकल्पनेतून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरु झाली. यामुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आले याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो असे सांगून परिवहन तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी जिल्हा प्रशासनाचेही याबद्दल अभिनंदन केले.

 ओसर सुरु

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून  रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयांमध्ये कोरोना नियंत्रणात आणता आला. रत्नागिरीत गेल्या २४ तासात एकाही मृत्युची नोंद नाही हे देखील त्यामुळेच शक्य झाले असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

शुन्याकडे वाटचाल

रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या  रत्नागिरी तालुक्यासह लगत माझ्या मतदार संघात आता आकडा शुन्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व जिल्हा प्रशासन यांचे यश आहे असे सांगून  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपण लवकरच या प्लाझमा उपचार सुविधेतून मृत्यूदर देखील एक टक्क्यांच्या खाली नेऊ असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. इंन्दुराणी जाखड यांनी आभार मानले.

कोरोना युध्दात फुले आजही

कार्यक्रमाची तयारी करीत असतानाच पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले या रुग्णालयातून  कार्यक्रमात सहभागी झाल्या याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेत फुले-शाहूंनी घडविलेल्या या महाराष्ट्रात कोरोना युध्दात आजही फुलेंचा सहभाग आहे अशा शब्दात त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

शासन देणारच आहे

माझ्याकडे कौतुकाचे अभिनंदानाचे शब्द कानावर येतात त्यावेळी त्यामागे आपली मागणी केलेली असते. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करा. रायगड आणि सिंधुदूर्गात दिलय तसच ते तुम्हालाही देवू असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *