Breaking News

“नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो” मुख्यमंत्री-पंतप्रधान खाजगी भेट मुख्य भेटी आधी ३० मिनिटांची खाजगी भेट

नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी

राज्यातील विविध प्रश्नांची त़ड लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. मात्र शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक खाजगी बैठक पार झाली. या बैठकीबाबत महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांनी याबाबत सतत विचारणा करण्यास सुरुवात केली असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो. राज्यातल्या प्रश्नांची तड लावण्यासाठीच पंतप्रधानांची भेट घेतल्याचे सांगत जरी आम्ही सत्तेत एकत्र नसलो तरी नातं कायम असल्याचे स्पष्ट केले.

मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेली खाजगी भेट ही महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा दिल्ली वर्तुळात पसरली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारमधून शिवसेना लवकरच बाहेर पडण्याच्या तयारीत असून त्यादृष्टीनेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात तात्काळ भूकंप होणार नसला तरी आगामी काळातील तयारीचा भाग म्हणून तर ही भेट नाही ना अशी शंकाही यानिमित्ताने राजकिय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून शिवसेनेवर दबाव आणला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खाजगी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने आणि “नातं” असल्याचा खास उल्लेख केल्याने छोटा भाऊ-मोठा भाऊ या नात्याने दूरावलेली मनं सांधण्याचा तर उध्दव ठाकरे यांचा प्रयत्न नाही ना? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातला छोटा भाऊ केंद्रातल्या मोठ्या भावाला साथ देणार का? की महाराष्ट्रातल्या आपल्या काकांची (शरद पवार) यांना कायम साथ देणार याचे उत्तर आगामी काळातच मिळेल.

Check Also

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *