Breaking News

शिवसेनेला चुचकारत मुख्यमंत्र्यांची नाणार प्रकल्पाबाबत सावध भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतरही संभ्रम कायम

नागपूर : प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून नाणार रिफायनरी प्रकल्पावरून विधानसभेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तरीही या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना नाणार राहणार कि जाणार याबाबत स्पष्टपणे न सांगता याबाबत सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांशी आणि स्थानिकांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगत प्रकल्पाबाबतच्या भवितव्याबाबत संभ्रमावस्था कायम ठेवली.

वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्पाचा निर्णय झाल्यानंतर हा प्रकल्प आपल्या राज्यात व्हावा यासाठी महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी मागणी केली. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात विशेषत: कोकणात ३ लाख कोटींची गुतवणूक होणार आहे. गुजरातमधील जामनगर रिफायनरी प्रकल्पामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्याच अनुषंगाने याप्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणार परिणाम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

हा प्रकल्प ग्रीन प्रकल्प असल्याने कोकणात कोणत्याही पध्दतीचे प्रदुषण होणार नाही. उलट झालेच येथील फळबागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पाबाबत फारसा कोणाचा विरोध नव्हता. तसेच हा प्रकल्प तेथे सुरु करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने मांडलेल्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या. फक्त जमिनीच्या किंमतीची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यानंतर या भागात काही एनजीओ आल्या आणि त्यानंतर विरोध सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्र्यांच्या घोषणेची फाईल आली पण निर्णय नाही

या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहण करण्याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने केलेली फाईल माझ्यापर्यत आली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जसा समृध्दी महामार्ग प्रकल्पाला सुरुवातीला विरोध झाला. मात्र नंतर त्याबाबत चर्चा करण्यात आली आणि मार्ग काढण्यात आला व प्रकल्पाचे काम सुरु झाले. त्याअनुषंगाने याप्रकल्पाबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल मात्र हा प्रकल्प जनतेवर लादणार नसल्याचे पुन्हा सांगत याबाबत त्यांनी संभ्रम कायम ठेवला.  तसेच या प्रकल्पाच्या अनुषंगाने नव्याने अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि निरीला काम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी: विखे-पाटील

मुळ कोकणवासिय नसलेल्या व्यक्तींनी या प्रकल्पाला सहमती दिलीय. यातील एक व्यक्ती तर गायब आहे. त्याची जमिन खरेदीचे खोटे दस्तऐवज तयार करून जमिन खरेदी दाखविली. नाणार रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी यावेळी केली.

हा महाराष्ट्राच्या हिताचा कसा ? याचा खुलासा करावा

हा प्रकल्प महाराष्ट्राच्या कसा हिताचा आहे? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. सौदी अरबियाला ५० टक्के भागीदारी देण्यात आलीय. तेथील परिस्थिती सर्वांना माहित असून या प्रकल्पामध्ये पाकिस्तानचे नागरिक काम करतील अशी भीती व्यक्त करून नाणार प्रकल्पावरून सरकार अल्पमतात असताना तुम्ही कामकाज रेटणार का? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले की, या प्रकल्पाचे प्रेझेटेशन सर्वांसमोर करून याची सायन्टीक माहिती देतो. समृध्दी महामार्ग प्रकल्पावेळीही अनेकांनी मोठ्या घोषणा केल्या. आमचा सहकारी पक्षही या विरोधात होता. मात्र आम्ही चर्चा करून सर्वांना समजाविले आणि त्याचे काम सुरु झाले.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी स्थानिक जनतेचा विरोध असल्याने शिवसेना जनतेसोबत आहे. किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात होत असल्याने या भागाचे नुकसान होणार आहे. या लोकांनाच हा प्रकल्प नकोय म्हणून शिवसेनेने विरोध केलाय. कोकणातील १२ ते १३ लाख आंब्याच्या झाडाचे नुकसान, मच्छिमारीचे नुकसान, केळी, शेती आदींचे नुकसान होणार आहे. सर्वांच्या घरादारांचा विध्दंस होणार आहे. त्यामुळे विरोध. जांबा दगड असून याखाली सल्फर आहे. त्याचा स्फोट झाला तर मोठे नुकसान होईल. कोकणी माणसाला वाचवायचा असेल तर हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा. जिकडे नेणे शक्य असेल तिकडे नेण्याची मागणी केली.

शिवसेनेच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत नाणार प्रकल्पाबाबत सगळ्यांची आग्रही मागणी असून हा प्रश्न फक्त हो किंवा नाहीवर आधारीत आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांनी सुस्पष्ट भाषेत सांगावे सांगावे अशी मागणी केली. तसेच याबाबत तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला उध्दव ठाकरे यांना या प्रकल्पाचे प्रेझेंन्टेशन दिले असेल तरीही ते विरोध करतात असे सांगताच सुनिल प्रभू यांनी हरकत घेत ठाकरे यांना कोणतेही प्रेझेटेशन दिले नसल्याचे सांगत सदरचे वक्तव्य काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून तुम्ही अद्याप उध्दव ठाकरे यांना प्रेझेन्टेशन दिले नाहीत. तर काय केले? असा मिश्किल सवाल केला. त्यावर सभागृहात एकच हशा उसळला.

जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की,जयंत पाटील वकील झाले असते तर ते अधिक यशस्वी झाले असते. प्रत्येक गोष्टीमध्ये हो किंवा नाही असे उत्तर देता येत नाही. रिफायनरी झाली पाहिजे ती देशाच्या हिताची आहे. पण हा प्रकल्प कोणावरही लादणार नसून सर्वांशी विचारविनियम करूनच हा प्रकल्प केला जाईल असे शेवटी सांगत मुख्यमंत्र्यांनी याबाबत संभ्रम कायम ठेवला.

त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जात नाणार प्रकल्पाच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केल्याने अखेर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी सुरुवातील आणि नंतर १५ मिनिटांसाठी तहकूब केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जाहिर केले ९ उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *