Breaking News

मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या करमाफी आश्वासनाचे काय झाले ? शिवसेना आमदारांची नगरविकास विभागाला विचारणा

मुंबईः प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणूकीच्या कालावधीत 500 चौरस फुट क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता करात माफी देण्याचे आश्वासन सत्ताधारी शिवसेना व भाजपने दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईकरांचे मन जिंकून घेण्यासाठी विधानसभेत आश्वासन दिले. परंतु त्यास पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी मुंबईकरांना करमाफी देण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने अद्याप राज्य सरकारला दिला नसल्याने मुंबईकरांच्या हिताच्यादृष्टीने महत्वाचे असलेल्या या प्रस्तावाचे काय झाले अशी विचारणा शिवसेनेच्या 16 आमदारांनी नगरविकास विभागाकडे एका निवेदनाद्वारे विचारणा केली.
निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शिवसेनेने मुंबई महापालिकेत 6 जुलै 2017 रोजी ठराव मंजूर करत 500 आणि 700 चौरस फुटाच्या सदनिकेत राहणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेच्या आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सकारात्मक उत्तर देत मालमत्ता करात माफी देण्याचे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही नगरविकास विभागाने यासंदर्भात मुंबई महापालिकेला विचारणा केलेली नाही की त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे मुंबईतील आमदार सुनिल प्रभू, अनिल परब, अजय चौधरी, सदा सरवणकर, सुनिल शिंदे, रमेश लटके, संजय पोतनीस, सुनिल राऊत, मंगेश कुडाळकर, प्रकाश फातर्पेकर, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, तुकाराम काते, श्रीमती तृप्ती सावंत, विलास पोतनीस, डॉ. मनिषा कायंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना निवेदन सादर करत प्रस्तावाचे काय झाले अशी विचारणा केली. तसेच याबाबतचे आदेश लवकरात लवकर जारी करावेत अशी मागणी केली.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *