Breaking News

मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि ४० चोरांची टोळी?

गिरीष बापट यांची हकालपट्टी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली नाही. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज आहे का? असा परखड सवाल करून बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
राज्य सरकारने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप आहेत. पण भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना क्लीन चीट देत आहेत. नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देण्यासाठी गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला आहे असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तरी अद्याप त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी का केली नाही? असा परखड सवाल सावंत यांनी विचारला. यापूर्वीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल समूहाने खोटी कागदपत्रे सादर करून सरकारी अनुदान लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दुग्धविकास विभागाने दिले आहेत. त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून बंगला बांधला आहे. देशमुख यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून लोकमंगल समूहाला मदत केली आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे. नुकतेच गुंतवणूक दारांचे ७५ कोटी रूपये परत दिले नाहीत म्हणून सेबीने लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजची खाती गोठवली आहेत. आपल्याच सरकारच्या एका विभागाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देऊनही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही हे दुर्देवी आहे. राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात लातूर न्यायालयात खटला दाखल आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर बँक घोटाळ्याचा आरोप आहे. या सर्व भ्रष्ट मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याऐवजी त्यांना क्लीन चीट देऊन त्यांचे संरक्षण करण्याचेच काम मुख्यमंत्री करत आहेत. घोटाळेबाज मंत्री आणि त्यांना क्लीन चीट देणारे मुख्यमंत्री यांच्याकडे पाहून राज्याचे मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि चाळीस चोरांची टोळी? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *