Breaking News

अधिवेशनात आश्वासन देवूनही बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना विरोधी पक्षनेते आणि गृहनिर्माण विभागाकडून दोनवेळा स्मरणपत्रे

मुंबईः प्रतिनिधी

मुंबईतील समता नगर पुर्नविकास प्रकल्पालाच्या मान्यतेवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता हे संशयाच्या भोवऱ्यात आले. याविषयीचा मुद्दा अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर सदर प्रकरणी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आश्वासनास सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी वेळच मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

समता नगर पुर्नविकास प्रकल्पाच्या मान्यतेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मेहरबानी केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या विषयी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या वेळी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रश्नी सर्व पक्षिय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार एप्रिल महिना संपल्यानंतर साधारणतः मे-जून या दोन महिन्या दरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याविषयाचे स्मरण करून दिले. तसेच गृहनिर्माण विभागानेही याबाबतचे स्मरण पत्र लिहीत मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिल्याचे गृहनिर्माण विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा २१ सप्टेंबर २०१८ रोजी स्मरण पत्र लिहीत मुख्यमंत्र्यांना बैठक घेण्याबाबत विनंती केली. परंतु याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही माहिती कळविण्यात आली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने केलेल्या घोटाळ्याचा विषय विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्यात येतो आणि त्यावर मुख्यमंत्र्यांकडून बैठक घेण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र त्या आश्वासनास सहा महिन्याचा कालावधी लोटूनही ते आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पाळले जात नसणे ही खेदाची बाब असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *