Breaking News

आम्ही विदर्भाला पैसे दिलेच पण पश्चिम महाराष्ट्रालाही पूर्ण निधी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर

सांगली-पलूसः प्रतिनिधी
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात डझनभर मंत्री होते. विदर्भाचा अनुशेष म्हणून तिकडे पैसे द्यावे लागतात असे सांगून ते पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना निधी देत नव्हते. आम्ही सत्तेवर आल्यावर विदर्भाला तर निधी दिलाच पण पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू- ताकारी – म्हैसाळ अशा सर्व योजनांसाठी पूर्ण निधी तर दिलाच आणि या योजना पूर्ण करण्यासाठी अत्यंत वेगाने काम सुरू केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली जिल्ह्यात पलूस येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, खासदार संजयकाका पाटील, आ. शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित होते.
टेंभू- ताकारी- म्हैसाळ या सिंचन योजना यापूर्वीच्या युती सरकारच्या काळात सुरू झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात त्या पूर्ण झाल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे डझनभर मंत्री होते. टेंभू योजनेचे चार टप्पे पूर्ण केले असून पाचवा टप्पा पूर्ण करत आहोत. या एका योजनेमुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये 4 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सांगली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी 9000 कोटी रुपयांची तरतूद करून त्यांचे काम गतीने सुरू केले. आगामी काळात हे सर्व प्रकल्प पूर्ण करू असे त्यांनी सांगितले.
आपल्या सरकारने 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. सांगली जिल्ह्यात 510 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी 600 कोटी अनुदान पाच वर्षात दिले. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची योजना नाही, असे एकही गाव असणार नाही.
या वर्षी सांगली, कोल्हापूरमध्ये प्रचंड पूर आला आणि अतोनात नुकसान झाले. पावसाचे आणि पुराचा विक्रम झाला. महाबळेश्वरमध्ये जगातील सर्वाधिक पाऊस पडला व त्यामुळे प्रचंड मोठा पूर आला. राज्य सरकारने तातडीने मदतीचे निर्णय घेतले. प्रत्येकाला मदत पोहचेपर्यंत मदतकार्य चालूच राहील. असा पुन्हा पुन्हा मोठा पाऊस येणार असेल तर पुरामुळे किती नुकसान करून घ्यायचे हा प्रश्न आहे. पुरापासून मुक्ती मिळावी यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या मदतीने एक योजना राबविण्यात येणार आहे. पूर आला तरी रस्ते वाहतूक, वीज पुरवठा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू राहील अशा पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. तसेच पुरामुळे आलेले जास्तीचे पाणी वळवून जतसारख्या दुष्काळी भागात पोहचविण्यात येईल. भविष्यात पुराचा धोका राहणार नाही आणि दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळेल. या योजनेला जागतिक बँकेने हिरवा कंदिल दाखवला आहे. सविस्तर अहवाल बनवून याचे काम सुरू करू. या कामाला वेळ लागेल पण व्यापक हितासाठी ते करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, ही ऐतिहासिक घटना घडली. त्यांच्या पूर्वी छत्रपती शिवेंद्रराजे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. शाहू महाराज ज्या घराण्यात जन्माला आले त्या घाटगे घराण्यातील समरजीत घाटगे भाजपामध्ये दाखल झाले आहेत. शाहू महाराज ज्या घराण्यात दत्तक गेले त्या घराण्यातील छत्रपती संभाजीराजे भाजपाशी जोडले गेले आहेत. अशा रितीने छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याशी संबंधित कुटुंबे भाजपाशी जोडली गेली आहेत.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *