Breaking News

मुख्यमंत्री महोदय…महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या केवळ १० किलो धान्याचा आदेश हि पुरग्रस्तांची थट्टा असल्याचा नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

मुंबई : प्रतिनिधी
माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचे स्वागत करतो. मात्र तुमच्यापुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पुरपरिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, ते ही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्या जिवांना तरी तुमच्या गांभीर्याने घेण्याचा निकष लागु होतो का ?ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसविले त्या राज्याला तरी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करा व लोकांचे जीव वाचवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केले.
एकीकडे राज्यात पुरपरिस्थिती असतांना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेतून मतांची भिक मागण्यात व्यस्त होते. दरम्यान माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ते यात्रा थांबवुन दिल्ली येथे गेले. अंत्यविधी नंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा थांबविल्याची जाहिरातबाजी भाजपाच्या आयटी सेलने सुरू केली. असा घृणित प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांच्या जाण्याने निश्चितच राष्ट्रीय हानी झाली आहे. मात्र एकीकडे सुषमा स्वराज यांच्या सारख्याच हजारो महिला, वृद्ध, लहान मुले महापुराच्या संकटात असतांना राज्य वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्ययात्रेसाठी दिवसभर दिल्ली येथे होते. आपल्या कार्याप्रती नेहमी सजग असलेल्या कर्तव्यनिष्ठ सुषमा स्वराज यांनाही कदाचित मुख्यमंत्र्यांची हि भुमिका आवडली नसेल. जनतेला संकटात सोडून मुख्यमंत्री अंत्ययात्रेला आले, या गोष्टीमुळे त्यांच्या आत्म्याला नक्कीच कष्ट झाले असतील असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न असतांना राज्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र यवतमाळ येथिल पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी नाना पटोलेंना गांभीर्याने घेत नाही’. पेशवा दुसरा बाजीराव देखील अठरापगड जातींना गांभीर्याने घेत नव्हता. ते संकटात असतांना त्यांना मदतीचा हात देत नव्हता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यातील जनतेला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
जर मुख्यमंत्र्यांनी वेळीच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी संपर्क करून अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याची विनंती केली असती तर पुरपरिस्थिती एवढी भयंकर झाली नसती. मुख्यमंत्री पुरपरिस्थितीच्या उपाययोजनांबद्दल केवळ फोनवरून सुचना दिल्या आहेत असे उत्तर ठिकठिकाणी देत होते. मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या न हाकता प्रत्यक्ष काम हाती घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या असत्या तर एवढे बळी गेले नसते. एवढी गंभीर परिस्थिती सर्वत्र दिसत असूनही योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय आपत्ती जाहीर करू असे उत्तर मुख्यमंत्री देतात. त्यामुळे वास्तव डोळ्यासमोर असून देखिल मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय आपत्ती जाहिर करण्यास कोणता मुहुर्त हवा आहे ? हे जाहिर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी हवे असा सवालही त्यांनी केला.
संतापजनक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शासन आदेश काढून ज्या घरात दोन दिवस पाणी होते, केवळ त्यांनाच दहा किलो धान्य देण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुरात सर्वस्व गमावलेल्या जनतेची ही खिल्ली उडविणे आहे. त्यामुळे आता पुरग्रस्त भागाचा दौरा करून तिथल्या जनतेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *