Breaking News

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे फडणवीसांवर टीकास्त्र

महाड : प्रतिनिधी

महाराष्ट्रात अजून विधानसभेसाठी मतदान झालेले नाही. तरीही राज्याचा पुढील मुख्यमंत्री मीच, असा दावा देवेंद्र फडणवीस करत आहेत. ईव्हीएमबाबत लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठीही ईव्हीएम मॅनेज करून ठेवलेत की काय, अशी शंका निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

महाड येथील विशाल जनसंघर्ष सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रे हॅक केल्याच्या गौप्यस्फोटानंतर संपूर्ण देशात गदारोळ निर्माण झाला आहे. हाच धागा धरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली. मात्र भाजप शिवसेनेच्या सत्ताकाळात जनता अक्षरशः विटली असून त्यांना काँग्रेसमुक्त नको तर काँग्रेसयुक्त भारत हवा असल्याचे मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निकालातून दिसून आले आहे.

खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रियंका गांधी यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रियंका गांधी यांना पक्षात जबाबदारी दिली जावी अशी मागणी असंख्य कार्यकर्ते करित होते. प्रियंका गांधी यांनी सरचिटणीसपदासह पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आगामी निवडणुकीत त्यांचा झंझावात दिसून येईल असा विश्वासही खा. चव्हाण यांनी व्यक्त केला.

भाजप शिवसेनेचे केंद्र व राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर सिमेंट रस्त्यांच्या कामांना वेग देऊन कंत्राटदारांची घरे  भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. पुढील काळात लोकांची दिशाभूल करणारे आणि सवंग प्रसिद्धी मिळवून देणारे आणखी काही निर्णय घेतले जातील, घोषणा केल्या जातील. मात्र आता जनता यांच्या थापेबाजीला बळी पडणार नाही. कारण शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती, महागाई, कायदा सुव्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर या सरकारच्या अपयशाचे परिणाम जनतेने मागील साडेचार वर्ष भोगले आहेत, असे सांगून खा. अशोक चव्हाण यांनी पुढील निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.  

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने महाडमध्ये झालेल्या विशाल जाहीर सभेने संपूर्ण रायगड जिल्हा काँग्रेसमय झाला, असून आगामी निवडणुकीत महाडच्या जनतेचा कौल काय असेल हे स्पष्ट झाल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. तत्पूर्वी महाड शहरात आगमन झाल्यानंतर तरूण कार्यकर्त्यांच्या विशाल रॅलीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत झाले. खा. अशोक चव्हाण व यात्रेत सहभागी प्रमुख नेत्यांनी मिरवणुकीने चवदार तळ्यावर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, माजी आ. माणिकराव जगताप आदी नेत्यांनीही या सभेला मार्गदर्शन करून सरकारच्या चुकीच्या धोरणांवर चौफेर टीका केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *