Breaking News

वकिलांची चांगली फौज, अनिल परबांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

सांगली: प्रतिनिधी

हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत आपल्याकडे वकिलांची चांगली फौज असून ते सतत कायद्याची सविस्तर माहिती घेवून त्यानुसार न्यायालयीन लढ्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार सारखं न्यायालयाकडून थपडा खात असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु आहे. कायद्याच्या दृष्टीनं केसेस दाखल होत आहे. नाशिक युनिटने चार केसेस दाखल केल्या असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सांगली येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करत आहेत. राणेंच्या विषयात उद्धव ठाकरे यांचं वाक्य वाहून गेलं. आपण उद्धव ठाकरे हे काय बोलले होते हे सांगायला कमी पडलो. आम्ही तुटू फुटू असं त्यांना वाटतंय. पण आम्ही सुद्धा संयमाने एक एक बॉम्ब टाकतो आणि गायब होतो, असा इशाराही त्यांनी यावेळी देत सत्ता गेल्यानंतर मनस्थिती टिकवणं अवघड आहे. पण इथून कुणीही जाणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला.

ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही. नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरु आहे. लोक निवडणुकीची वाट पाहत आहे. पंढरपूर प्रमाणे देगलुरची पोटनिवडणूकही भाजप जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा

ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणूनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सोमवारी ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ,घंटा व शंख वाजवून मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलायेंगे ॥ हा नारा देत आंदोलन करावे अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

Check Also

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *