Breaking News

चंद्रकांत पाटील यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निषेध विधिमंडळ अधिवेशनात आशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न लावून धरू

पुणे : प्रतिनिधी

आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत, याचा आपण निषेध करत असल्याचे सांगत विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

समाजाच्या कोणत्याही घटकाने अन्यायाच्या विरोधात बोलता कामा नये, असे या सरकारचे धोरण आहे. कोणीही आंदोलन केले की लगेच गुन्हे दाखल करायचे, लाठीचार्ज करायचा असे चालू आहे. ज्या आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीत काम केले, त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या. पण ‘हम करे सो कायदा’, असे चालू आहे, याचा आपण निषेध करत असून विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रश्नावर भाजपा सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा. राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपाची संघटनात्मक रचना बळकट असल्याचे ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *