Breaking News

चारा छावण्यांना तात्काळ मुदतवाढ द्या, अन्यथा यात्रा अडवू काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी
आज पोळा हा शेतक-यांचा सर्वात मोठा सण आहे. पण दुर्देवाने राज्याच्या काही भागात भीषण दुष्काळी परिस्थीती आहे. मराठवाड्यातल्या शेतक-यांवर तर चारा छावणीत पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत असून पाणी आणि चा-याची भीषण टंचाई आहे. चारा छावण्यांची मुदत उद्या संपत असून सरकारने तात्काळ चारा छावण्यांना मुदतवाढ द्यावी अन्यथा १ सप्टेंबर रोजी बळीराजा आणि त्याच्या पशुधनाला सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अडवू, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांनी दिला.
राज्यातला शेतकरी सध्या अत्यंत अडचणीत असून अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करत आहे. राज्याच्या काही भागात पूरस्थिती आहे तर काही भागात भीषण दुष्काळ आहे. मराठवाड्यात भीषण पाणी आणि चारा टंचाई आहे. पाऊस पडल्यावर सर्व काही सुरळीत होईल या अपेक्षेने सरकारने दुष्काळनिवारणासाठी काही उपाययोजना केल्या नाहीत. अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सरकारने चारा छावण्या बंद केल्या होत्या पण सामाजिक व राजकीय कार्यकर्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने चारा छाववण्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत उद्या संपत आहे पण दुर्देवाने अद्यापही मराठवाड्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ चारा छावण्यांना मुदतवाढ देऊन मागणी प्रमाणे चारा छावण्या सुरु कराव्यात. तसेच पूरग्रस्त भागातही चा-याचा प्रश्न गंभीर बनला आहे तिथेही मागणीप्रमाणे चारा छावण्या द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *