Breaking News

महात्मा फुले जीवनदायीतून कर्करोगावरील उपचारासाठी मदत मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. मात्र राज्यात कर्करोगाचे वाढते रूग्ण लक्षात घेता महात्मा फुले जीवनदायी आरोग्यसेवेच्या माध्यमातून इतर मोठ्या आजारांबरोबरच कर्करोगाच्या रूग्णांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

धुळे येथील खानदेश कॅन्सर सेंटरचे भूमीपूजन, राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलच्या शुभारंभ मुख्यमंत्री.फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष  भामरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री  जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात कर्करोगाच्या रुग्णांचे  सर्वाधिक प्रमाण आढळून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. तंबाखू, गुटखा सेवनाने हे प्रमाण वाढत  आहे. अलिकडे केलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत शाळेतील काही विद्यार्थ्यांमध्ये कर्करोगाची लक्षणे  आढळून आली आहेत. या रोगामुळे रुग्णाला त्रास होतोच. त्याबरोबरच त्याच्या कुटुंबियांचीही फरफट होते.याबाबत मुंबईतील टाटा मेमोरिअल रूग्णालयात यावर उपचार होतात. मात्र, मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या  रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल टाळण्यासाठी टाटा इस्पितळात मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण  व दर्जेदार सोयी सुविधा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

कर्क रोगाच्या रुग्णांना होणारा त्रास पाहिला जात नाही. तंबाखू, गुटख्याचे सेवन कर्करोगाला निमंत्रण  देणारे ठरू शकते. त्यामुळे कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिलेलेच बरे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी उपचारापूर्वीच काळजी घेतलेली केव्हाही चांगलेच राहते. अशा रुग्णांवर कमीत कमी खर्चात आणि सामाजिक बांधिलकीतून खानदेश कॅन्सर सेंटरमध्ये उपचार होतील, असा विश्वास वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केला.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले की, ३०  वर्षांपूर्वी  मुंबई  सोडून  धुळ्यात  रुग्ण  सेवेला सुरूवात केली. त्यानंतर मुलगा डॉ. राहुल यांनी रुग्णसेवेचा वसा घेतला. कर्करोगाच्या रुग्णांवरील  उपचार खर्चिक व दीर्घकालिन असतात. त्यामुळे  कर्करोगाविषयी  समाजात  जनजागृती  वाढली  पाहिजे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *