Breaking News

देशाबाहेर काढणारा कायदा नसल्याचे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर समर्थन करावे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबदद्ल गैरसमज आहेत. हा कोणालाही देशाबाहेर काढण्याचा कायदा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच म्हणाले. त्यामुळे त्यांनी आता सीएएच्या समर्थनाची उघड आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांची बुधवारच्या मुलाखतीतील वक्तव्ये सीएएविषयी वस्तुस्थिती स्पष्ट करणारी आहेत. ते म्हणतात की, सीएएबद्दल किती गैरसमज आहेत ते आधी दूर करायला हवेत. सीएए हा देशातील कोणालाही बाहेर काढण्याचा कायदा नाही. हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. त्यांच्या पक्षाने लोकसभेत सीएएच्या बाजूने मतदान केल्याची आठवण त्यांनी शिवसेनेला करून दिली.
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स अर्थात एनआरसीबाबतही मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थितीचाच उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, एनआरसी हा विषय आलेला नाही. त्यासाठी आतापासून भूई धोपटण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्या विरोधात मोर्चे निदर्शने करण्यात अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका केंद्र सरकारच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशव्यापी एनआरसीचा निर्णय झालेला नाही, असे केंद्र सरकारने काल लोकसभेत स्पष्ट केले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा तेच म्हणत आहेत. त्यामुळे आता राज्यात एनआरसीवरून जे वादविवाद चालू आहेत ते थांबायला हवेत, गैरसमज दूर व्हावेत आणि आंदोलकांनी आंदोलने करू नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *