मुंबई : प्रतिनिधी
कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
अगोदर अर्णब गोस्वामी आणि आता कंगना राणावत यांच्या प्रकरणात न्यायालयाकडून आलेल्या निर्णयामुळे ठाकरे सरकार किती सूडबुद्धीने काम करीत आहे या वर शिक्कामोर्तब झाला आहे. आपला अहंकार जपण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई घडवून आणली असून कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई आणि वकिलांना दिलेली करोडो रुपयांची फी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, मारहाण करणे, जेल मध्ये टाकणे व या ना त्या मार्गाने लोकांचा आवाज दडपण्याचेच काम हे ठाकरे सरकार करत असून ठाकरे सरकारकडून राज्यात छुपी आणीबाणी लागू केली गेली असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.
