Breaking News

बीएमसीच्या कोट्यावधीच्या ठेवी मोडा आणि नुकसानग्रस्तांना घरटी १० हजार द्या अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट असणारे लोकं तसेच चाळींमधील निम्न-मध्यम वर्गीय अशा सर्वच लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागल्यामुळे मुळातच त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची आर्थिक बचत आता राहिलेली नाही. अशा काळामध्ये वारंवार आलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी सर्वसामान्य माणसाची स्थिती झालीय. कोरोना महामारीमध्ये राज्य सरकारने एका रुपयाची ही मदत मुंबईकरांना केली नाही. ७०,००० कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. या कोरोना व बेसुमार पावसामुळे घरांवर तुळशीपत्र ठेवावे लागत असलेल्या मुंबईकरांच्या घराचे तात्काळ नजर पंचनामे करून घरटी १० हजार रुपयांची मदत करावी व झोपडपट्टीवासीय, चाळीतील रहिवासी, रिक्षा चालक, घरगुती काम करणाऱ्या महिला, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा सरसकट १०,००० रुपयांची मदत करण्याची मागणी भाजपा आ. अतुल भातखळकर यांनी केली.

मुंबईतील कष्टकरी आणि अतिवृष्टी नुकसानग्रस्तांच्या मागण्यांसाठी आज कांदिवली पूर्व येथील तलाठी कचेरीवर काढलेल्या मोर्चा काढला. त्या वेळी ते बोलत होते.

कोरोनाने संपूर्ण मुंबईत हाहाकार माजला असताना उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे एक वेळा सुद्धा उपनगरांत फिरकले नाहीत, तसेच मागील ८ महिन्यांत जिल्हा नियोजनची बैठक सुद्धा घेतली नाही, त्यामुळे अगोदर कोरोना आणि आता बेसुमार पावसामुळे मुंबईकरांचे बेहाल होत असताना ठाकरे सरकार मात्र मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून ताज बरोबर पर्यटनाचे करार करण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच, पोईसर नदी रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या हनुमान नगर व पोईसर येथील कुटुंबाना झो.पु.प्रा. च्या ताब्यातील आप्पापाडा, मालाड पूर्व येथील घरे देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता, परंतु आता तो निर्णय बदलून ती घरे माहुल येथील लोकांना देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मुळात पोईसर नदीच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या पोईसर व हनुमान नगर येथील कुटुंबांना, तसेच उत्तर मुंबई परिसरातील बाधितांना ही घरे प्राधान्यक्रमाने मिळणे आवश्यक आहे. ते राहात असलेल्या परिसरातच त्यांना घरे मिळाली तर पोईसर नदी रुंदीकरण प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर होऊन, प्रकल्प झपाट्याने पूर्ण होतील. परंतु तसे न करता या सर्व लोकांना चेंबूर येथे जाण्यास सांगितले जात आहे. याउलट चेंबूरच्या जवळ असलेल्या माहुल येथील लोकांना मालाड येथे आणण्यात येत आहे, त्यामुळे हा निर्णय अत्यंत चूक व अव्यवहारीक असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक शिवकुमार झा, सुनिता यादव, सुरेखा पाटील, उत्तर मुंबई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह हनुमान नगर, पोईसर  व कांदिवली विधानसभा मतदारसंघातील शेकडो रहिवाशी उपस्थित होते.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *