Breaking News

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी

आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता तोपर्यंत दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे, अशी उपरोधिक उपमा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नामोल्लेख टाळत उत्तर दिले.

मुंबईत बुधवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत गेली वीस वर्षे शिवसेनेची सत्ता आहे आणि गेली दीड वर्षे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प चाळीस हजार कोटी रुपयांचा आहे. तरीही लोकांचे शहरात हाल होत आहेत. आता तर मुंबईत असुरक्षित वाटू लागले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत लोक मुंबईत शिवसेनेला धडा शिकवतील.

भारतीय जनता पार्टीने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्याचा संकल्प त्यांनी गुरुवारी आपल्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी सेवाकार्याचे आयोजन केले होते.

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राज्यातील सत्ताधारी तीन पक्ष एकत्र असले तरीही आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपा स्वबळावर जिंकेल इतके मजबूत पक्ष संघटन निर्माण करणे हा आपला संकल्प आहे. भाजपा आज राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. भाजपाच्या विरोधात सत्ताधारी आघाडीचे तीन पक्ष एकत्र असूनही भाजपाने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकली. त्याच पद्धतीने साडेसहा हजार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला. पक्षाचे संघटन मजबूत आहे, ते आणखी मजबूत करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार समाजातील वंचितांसाठी शक्य तेवढे काम करण्याचा आपला सामाजिक संकल्प आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील वंचित घटकांतील १,३२० जणांना खासगी रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठीची मोफत कुपन देण्यात आली. तसेच मतदारसंघातील तीन हजार रिक्षाचालकांना सीएनजी इंधनासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची कुपन देण्यात येत आहेत. त्यापैकी अडीच हजार रिक्षाचालकांना गुरुवारी वाटप करण्यात आले. मतदारसंघातील वीस हजार मुलींना शिलाईसह ड्रेसचे कापड देण्यात येणार आहे. कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या छोट्या व्यावसायिकांना दहा हजार ते पन्नास हजार रुपये कर्जाच्या स्वरुपात मदतही करण्यात येणार आहे.

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *