Breaking News

शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून बसले भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात केली खरी, परंतु महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प बसले होते, अशी टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
वीज बिलाच्या बाबतीत सवलत देणार अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याच्या बाबतीत सुद्धा केवळ चालढकल करण्याचे धोरण अवलंबले आहे. केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाई करण्याचा दिखावा करायचा इतकेच काम ‘शिक्षणसम्राट-धार्जिणे’ महाविकास आघाडी सरकार करत आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करून सुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. यासंदर्भात आमची लढाई न्यायालयात सुरू असून न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थी-पालकांना फी मध्ये सवलत मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे सुद्धा आ. अतुल भातखळकर यावेळी म्हणाले.
यापूर्वीही अतुल भातखळकर यांनी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात येत असलेल्या फि वसुलीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बढ्या नेत्यावर टीकेची झोड उठविली होती. तसेच या शिक्षण सम्राट नेत्यामुळेच महाविकास आघाडी सरकार खाजगी शाळांच्या विरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप करत केवळ स्वतःच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून पाहिजे तशी फि वसुली करता यावी म्हणून फि सवलतीच्या निर्णयाला हा शिक्षण सम्राट मंत्री शालेय शिक्षण मंत्र्यावर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोपही भातखळकर यांनी केला होता.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *