Breaking News

फटकार मोर्च्यानंतर आता भाजपाचा शिवसेनेला इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही रोषही व्यक्त करायचा नाही का?

पुणे: प्रतिनिधी

अयोध्या येथील राम मंदिराच्या विरोधात सतत काही विरोधी मुद्दे उपस्थित करणे काँग्रेस आणि देशविरोधी शक्तींकडून चालू असताना, शिवसेनेने त्या सुरात सूर मिसळू नये. तुम्ही काही लिहिले तर रोषही व्यक्त करायचा नाही, अशी दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही शिवसेना भवनासमोर घडलेल्या प्रकारावरून शिवसेनेला दिला. चंद्रकांत पाटील गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिर निर्माण होत आहे. ते सर्वांच्या सलोख्याने होत आहे. त्यात अडथळा निर्माण करण्यासाठी रोज नवा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न काँग्रेस आणि देशविरोधी ताकदींनी चालवला आहे. पण स्वतःला राष्ट्रीय बाण्याचे म्हणवणारी शिवसेना त्याला पाठिंबा कशी देते ? असा सवालही त्यांनी केला.

अयोध्या येथील राम मंदिराबाबतचा विषय हा भारतीय जनता पार्टीचा किंवा विश्व हिंदू परिषदेचा किंवा मंदिराच्या ट्रस्टचा नाही तर सर्व हिंदूंचा आहे. त्याबाबत कोणी काही आक्षेपार्ह बोलले तर प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे असे आम्हाला वाटते आणि शिवसेनेला वाटत नाही. तुम्ही हिंदुत्व सोडले. सामनातून वाटेल त्या भाषेत निराधार टिप्पणी केली तर रोषही व्यक्त करायचा नाही का ? कार्यकर्त्यांनी परवानगी घेऊन शिवसेना भवनाच्या बाहेर निदर्शनेसुद्धा करायची नाही का ? अशी दंडुकेशाही चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेस पक्षाने भाजपाच्या प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने केली होती आणि शिवसेनेने निषेधाचा मोठा फलक लावला होता याची आठवण करून त्यांनी दिली.

मराठा आरक्षणाचा कायदा लागू असताना ज्या उमेदवारांच्या सरकारी नोकरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना नियुक्तीची पत्रे देणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करणे हे उपाय तातडीने करण्यासारखे आहेत. तसेच मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या तशा सवलतीही द्यायला हव्यात. मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने तयार करताना राज्य मागासवर्ग आयोगाने विस्तृत माहिती गोळा करण्याची गरज आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीही अशा प्रकारे माहिती गोळा करण्याची गरज आहे. दोन्हीसाठी आयोगाने  सर्वेक्षण करावे अशी मागणीही त्यांनी केली.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनास त्यांनी भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा जाहीर केला. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पक्षाने यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यासह जे कोणी नेते रस्त्यावर उतरून मराठा समाजासाठी आंदोलन करतील त्या सर्वांना भाजपाचा पाठिंबा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण या विषयांवर चर्चा करण्यासाठी किमान दोन दिवस राखून ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *