Breaking News

..तर मंत्र्यांना फिरू देणार नाही भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी करत राज्य सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने केली नाही तर या सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत धुळे, नागपूर, नंदुरबार, वाशीम, अकोला या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त मदान यांच्याकडे करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला निवडणूक घ्याव्या लागणार आहेत असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करून या निवडणुकांना स्थगिती मिळवावी. ओबीसी आरक्षण तिढा सुटेपर्यंत या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केल्यास निवडणुकांना स्थगिती मिळू शकते. राज्यातील आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा सादर करण्यास सांगितले असताना राज्य सरकारकडून काहीच हालचाल होताना दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपा तर्फे उद्या २६ जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच २८ जून रोजी या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकांना स्थगिती देण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने केली नाही तर या सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा- केशव उपाध्ये

आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना काँग्रेसच्या सहकार्याने राज्यातील जनतेला आणीबाणीचा अनुभव देते आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.

अटकेच्या भीतीने आणीबाणीला पाठिंबा देणारी शिवसेना आज काँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात सत्तेत आहे. राज्यातील तीन पक्षांच्या आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहेत. आणीबाणीत झालेले अत्याचार, सरकारी दडपशाही याचा प्रत्यय राज्यातील जनता सध्या घेत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने सध्या गळे काढले जात आहेत. मात्र आज राज्य सरकारच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही अशी आणीबाणी सदृश स्थिती असल्याची भीतीही त्यांनी यावेळई व्यक्त केली.

२५ जून १९७५ रोजी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली. आणीबाणी लादून काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला. त्या काळया पर्वाची माहिती युवा पिढीला करून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे शुक्रवारी राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे अनेक नेते यात सहभागी झाले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवा मोर्चातर्फे आणीबाणी च्या काळया पर्वाचे स्मरण करून देणारे कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *