मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे आणि डॉ. अनिल बोंद्रे यांचा समावेश होणार आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर यांचा समावेश होणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
खासदार सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सतत सुरु होती. अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देताच त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशा विषयीची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद कायम मानले जात आहे. तर मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीही मंत्री होण्याची इच्छा होती. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिका निवडणूकीत भाजपला चांगले यश मिळाले. तसेच लोकसभा निवडणूकीतही चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्याही मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय विधानसभेत संजय कुटे, डॉ.अनिल बोंद्रे, अतुल सावे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याची बक्षीसी म्हणून त्यांचांही मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना एम.पी.मिल कंपाऊड प्रकरणी लोकायुक्तांनी दोषी ठरविल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता असून त्यांच्या ठिकाणी योगेश सागर यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेत आलेले बीडचे जयदत्त क्षिरसागर यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री पद देण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
