Breaking News

कोरोना नियमांचे उल्लघंन करत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे शंखनाद आंदोलन महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो-चंद्रकांत पाटील

पुणे: प्रतिनिधी

राज्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने देत संख्या वाढू नये या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे मोदी सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाने ही सूचना करून ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत मंदीर सुरु करण्याच्या मागणीवरून पुणे येथे आंदोलन केले.

विशेष म्हणजे या आंदोलनात काहीजणांचा अपवाद वगळता चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी मास्कही परिधान केले नव्हते की सामाजिक अंतर नियमांचे पालनही केले नव्हते. त्यामुळे आगामी काळात पुणे येथील कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास भाजपाला जबाबदार धरावे अशी मागणी पुण्यातील काही सुजाण नागरीकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारला केवळ नोटांचा आणि दारु दुकानदारांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्यांना झोपेतून जागं करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून शंखनाद करण्यात येत आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आयोजित केलेल्या शंखनाद आंदोलनात पाटील हे पुण्यात सहभागी झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यातील मंदिर उघडण्यासाठी सद्बुद्धी मिळावी, यासाठी पाटील यांनी कसबा गणपतीला साकडं घालून गणपतीची महाआरती केली.

या आंदोलनात पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. मुक्ताताई टिळक, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झालं, त्यानंतरही सर्व सुरु झालं, मात्र मंदिरं सुरू झाली नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागल्याचे सांगून पाटील म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री होण्याआधी मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याचे आग्रही होते. पण अल्पसंख्याकांच्या मतांसाठी धर्म न मानणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केल्यानंतर मंदिरं उघडण्याला माझं प्राधान्य नाही, असं ते दाखवू लागले. आता त्यांना वारकऱ्यांचे श्रद्धाळूंचे आवाज ऐकू येत नाहीत. त्यांना फक्त नोटांचे, नोटा देणाऱ्यांचे, दारु दुकानदारांचे आवाज ऐकू येतात असा अशी टीकाही केली.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाचे दोन्ही लाटेत सर्वांनी निर्बंधांचं कटाक्षाने पालन करुन, सरकारला सहकार्य केलं. मात्र, कोरोनाची लाट ओसरु लागल्यानंतर हे सरकार लोकांना त्यांना जगण्याचा अधिकार नाकारु लागलं. त्यामुळे व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. आताही मंदिरासंबंधीत जे छोटे छोटे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असतानाही राज्य सरकार डोळे झाकून बसली आहे.

हिंदू जसे मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, त्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि जैन बांधव हे मशिद आणि चर्च, गुरुद्वारा, जैन मंदिर मध्ये जाऊन प्रार्थना करतात. या सर्वांनी प्रार्थनेसाठी मंदिरात जायचं नाही, तर मातोश्रीत जायचं का? असा सवाल उपस्थित करत मंदिर उघडण्यासंदर्भातील आदेश तात्काळ जारी करावा, अन्यथा भाजपाचे सर्व कार्यकर्ते मंदिराचे कुलूप तोडून, मंदिरे सर्व सामान्यांसाठी खुली करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

…ओबीसी व खुल्या वर्गावरचा अन्याय दुसरीकडे भरून काढणार राज्य सरकारचा निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या आदिवासीबहुल जिल्हयात ओबीसी जागांवर परिणाम होतोच आहे. शिवाय इतर खुल्या वर्गावरदेखील अन्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *