Breaking News

भाजपची शिवसेनेबरोबर युती राहयला हवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नितीन गडकरी यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी

आमची शिवसेनेसोबत युती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आमची युती आहे. कधी तरी थोडेफार इकडे तिकडे होते. तुझे माझे जमेना तुझ्याविना करमेना, अशी मराठीत म्हणच आहे. आमचेही थोडेफार तसेच आहे. युती आहे आणि ती राहिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीतील प्रचारात वाजवण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तथाकथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपबाबत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी लहानपणापासून ओळखतो. ते असे कधीही बोलणार नाहीत. तसा त्यांचा स्वभाव नाही. ते सुसंस्कृत आहेत. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदचा वापर करा असे म्हणाले असल्यास त्याचा अर्थ सर्व ताकद लावा असा होतो.

पालघर निवडणुकीत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले. मशीन बंद पडणे ही बाब निवडणूक आयोगाने गंभीर्याने घ्यायला हवी. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम योग्य, उत्तर प्रदेशात हरल्यावर त्यात गडबड आहे, असे म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काही गडबड वाटत असेल, तर त्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असेही गडकरी म्हणाले.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढत पूर्वीही वाढत होते. त्यावेळी आम्हीही आंदोलने केली. आम्ही त्यावेळी विरोधात होतो. आम्ही इंधनावरील सबसिडी बंद केली. अनेक विकासकामांवर पैसे खर्च केले. आता आम्ही जैविक इंधन, इलेक्ट्रिक वाहने अशी धोरणे राबवत आहोत. पेट्रोलियम मंत्रालय इथेनॉलचे पाच मोठे प्रकल्प उभारत आहेत. स्वस्त, पर्यावरणपूरक इंधन आम्ही भारतातच तयार करू.. इथेनॉल, इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधनाचे दर कमी होतील. इंधन जीएसटीच्या कक्षेत आल्यास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. राज्यांनाही फायदा होईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणीही केली आहे. येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला कोणी यायचे आणि कोणी जायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला पाहिजेत. संघ काही पाकिस्तानची संघटना नाही. आपल्याच देशातली आहे, असे सांगत गडकरी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रस्तावित नागपूर भेटीबद्दल विरोधी सूर आळवणाऱ्यांना सुनावले.

Check Also

गडकरींकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, गडकरी व आमदार मोहन मतेंवर गुन्हा नोंदवा

भारतीय जनता पक्ष सर्वकायदे धाब्यावर बसवून सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहे. भारतीय जनता पक्षाचे नागपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *