Breaking News

राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड रा.स्व.संघाच्या सर्वेक्षणात माहिती पुढे

मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. या निवडणूकीत २०१४ ची पुनरावृत्ती होणार की विरोधी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा सोपान मिळणार याची चाचपणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लागली आहे. त्यादृष्टीने संघाने सुरु केलेल्या सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला वारू रोखला जाणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याची माहिती राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
केंद्रातील सरकारला पाच वर्षे पूर्ण होत आली असून पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणूका पार पडल्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आगामी निवडणूकीत महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात राजकिय परिस्थिती जाणून घेण्यासाठी संघाकडून सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात राज्याच्या अनेक भागात विकास कामांची घोषणा करण्यात आली. तसेच मोठमोठ्या पायाभूत सुविधांच्या कामांची घोषणाही करण्यात आली. परंतु मुंबई वगळता एकाही जिल्ह्यात विकास कामे सुरु झालेली दिसत नाहीत. त्यातच भाजपच्या तिकिटावर निवडूण आलेल्या अनेक आमदारांची सत्ता असूनही सरकार दरबारी कामे होत नसल्याबाबतची तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेबरोबरच लोकप्रतिनिधीमध्येही मोठ्या प्रमाणावर भाजप सरकारच्या विरोधात नाराजी असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात एकही नवीन मोठा उद्योग आतापर्यंत आलेला नाही. त्याचबरोबर गुंतवणूकही वाढली नसून रोजगाराच्या संधीही उपलब्ध नव्याने झालेल्या नाहीत. यामुळे विदर्भातील विद्यमान जागांपैकी ३० टक्के जागा कमी येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही यंदा फारसा पाऊस पडला नसल्याने गतवर्षीप्रमाणे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या भागातही उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी विकास कामे अद्याप झालेली नाहीत. स्थानिक जनतेला सत्ताबदला नंतर परिस्थिती बदलेले अशी आशा होती. परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती निर्माण झालेली नसल्याने या भागात ५० टक्के जागा कमी येण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात ही थोड्या बहुत फरकाने अशीच परिस्थिती असल्याने राज्य सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी झालेली आहे. त्यामुळे या भागातही ४० टक्के कमी जागांचा फटका बसण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे राज्यात भाजपला एकहाती विजय मिळणे अवघड असल्याचे चित्र दिसत असल्याने युती प्रस्ताव तयार ठेवण्याचे संकेत संघाकडून भाजपला देण्यात आले आहेत. जनतेमधील वाढती नाराजीचा फटका राज्यातील आणि केंद्रातील भाजपला बसू नये यासाठी रा.स्व. संघाकडून पुन्हा हिंदू मताचे धुव्रीकरण करण्यासाठी राम मंदीराचा आणि हिंदूत्वाचा मुद्दा पुढे आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यातील भाषणा दरम्यान राम मंदीराचा मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *