Breaking News

हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे! देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत?

मुंबई: प्रतिनिधी
अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
त्याचबरोबर सीडीआर संदर्भातील माहिती तपास यत्रणांना न देऊन तसेच सीडीआर कोणी दिला हे न सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा घणाघाती आरोप करून फडणवीस यांनी या गुन्ह्यात सहभागी होऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली.
हिरेन मृत्यू प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश साध्य करण्यापायी भाजपा नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत सुटले आहेत. यातून भाजपा नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे. या प्रकरणातील सीडीआर आपल्याकडे आहे, असे फडणवीस यांनी विधीमंडळात जाहीर केले होते. सीडीआर मिळवणे हा एक अपराध आहे आणि स्वतः वकील तसेच माजी गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना याची पूर्ण माहिती आहे. परंतु सदर सीडीआर अद्यापही त्यांनी तपास यंत्रणांना दिला नाही. हिरेन प्रकरणातील दोषी पकडण्यासाठी सदर माहितीचा उपयोग झाला असता. यातून दोषीला पाठीशी घालण्याचा त्यांचा उद्देश आहे का ? असा सवालही त्यांनी केला.
कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ मार्च २०२१ रोजी अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या आरोपीची वैयक्तिक माहिती त्यामध्ये सीडीआरही आला, न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कोणाही अधिकाऱ्याने दिली तर त्याला दोषी ठरवलं जाईल. फडणवीसांना ती माहिती कोणी दिली हे न सांगून अशा अपराधी अधिकाऱ्यालाही ते पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गुन्ह्यामध्ये सहभागी होऊ नका अशी विनंती काँग्रेसतर्फे सचिन सावंत यांनी केली. तसेच १७ फेब्रवारीला मनसुख हिरेन ज्या मर्सिडीस गाडीतून फिरले ती गाडी एनआयएने जप्त केली आहे. सदर गाडीबरोबर ठाणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो आहे. बेछूटपणे आरोप करणाऱ्या भाजपाने या कनेक्शनबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *