Breaking News

….मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं ? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असं राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचार उघडकीस केल्याचा दावा करणाऱ्या भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून महाविकास आघाडी सरकारने रोखले. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ब्रीफिंग देण्यात आले किंवा नाही याची माहिती आपल्याला नसल्याचे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वरील विधान करत सवाल केला.

किरीट सोमैय्या हे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. सोमैय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याच्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हती असा खुलासा शिवसेनेच्या नेत्यांनी केला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना सोमैय्या यांना रोखण्यात आल्याच्या घटनेची कल्पना नव्हती असे स्पष्ट केले आहे. एवढ्या महत्वाच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती तर मुख्यमंत्र्यांना नेमकं काय माहिती असतं असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याचे ते म्हणाले.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. या घटनांचीही मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई कोकणवासीयांना मिळाली की नाही याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती. असे असेल तर राज्याचे सरकार चालविते तरी कोण ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राज्यातील जनतेच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांना माहिती नसते. मात्र स्वतः वर झालेल्या टीका टिप्पण्णीची त्यांना व्यवस्थित माहिती असते. त्यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना राणावत, अर्णव गोस्वामी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सरकारने तातडीने कशी कारवाई केली हे उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. हीच तत्परता सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबतही दाखवा असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

दरम्यान, किरीट सोमय्या प्रकरणी राज्याच्या गृहविभागाने केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकार बॅकफूटला गेल्याची चर्चा असून या संपूर्ण कारवाईचा ठपका अप्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांवर ठेवण्यात येत आहे. मात्र याची माहितीच मुख्यमंत्री ठाकरे यांना नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने याबाबत सरकारमधील विसंवादाचे चित्र बाहेर आले आहे.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *