Breaking News

अजित पवार, मुश्रीफ, शिंगणे, वडेट्टीवार या चार मंत्र्यांसह ८० जणांची चौकशी न्यायालयाकडे वर्ग करा नुरा कुस्ती टाळून शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याची भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम
राज्य सहकारी बँकेतील १ हजार कोटींच्या गैरप्रकारांच्या आरोपांतून उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, विजय वडेट्टीवार या चार मंत्र्यांसह ८० जणांच्या निर्दोष मुक्ततेवर शिक्कामोर्तब करण्याच्या हेतूने सहकार मंत्र्यांकडे बोगस अपील दाखल करण्यात आले असून नुरा कुस्तीचाच हा प्रकार आहे. सहकार खात्याच्या प्रधान सचिवांपुढे या अपीलाची सुनावणी न घेता हे अपील मुंबई उच्च न्यायालयाकडे सोपवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली .
या गैरप्रकाराची केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत (सीबीआय ) चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. मुंबई भाजपा व्यावसायिक आघाडीचे प्रमुख शैलेश घेडिया हे यावेळी उपस्थित होते.
राज्य सहकारी बँकेतील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने २०१३ मध्ये समिती नियुक्त केली होती. या समितीने राज्य बँकेतील घोटाळ्यांची व्याप्ती १ हजार ८६ कोटी इतकी असल्याचा निष्कर्ष काढला होता. शिवाजी पहिनकर व निवृत्त सत्र न्यायाधीश पंडितराव जाधव यांनी या घोटाळ्याची चौकशी करून अजित पवारांसह ७७ जणांना १८ फेब्रुवारी २०२० रोजी दोषमुक्त ठरविले. या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज बीड जिल्ह्यातील तात्यासाहेब नाटकर यांनी या चौकशी समितीपुढे अर्ज दाखल करून अजित पवार यांच्यासह ७७ जणांना दोषमुक्त ठरविण्याच्या निर्णयाला आव्हान दिले. याची सुनावणी सहकार खात्याच्या प्रधान सचिवांपुढे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार खात्याच्या सचिवांपुढे या अपीलाची न्याय्य पद्धतीने चौकशी होणे अवघड असल्याने सदरचे अपील उच्च न्यायालयात वर्ग करावे, असे न केल्यास मुख्यमंत्री , सहकार मंत्री या घोटाळ्यातील गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत हेच सिद्ध होईल. अर्ध न्यायिक अधिकारात हे अपील फेटाळले जावे असाच डाव नाटेकर यांच्या या अर्जामागे आहे. मुळात नाटेकर यांचा या चौकशीशी काहीही संबंध नाही. तरीही त्यांनी हे अपील दाखल केले असल्याने त्यामागचा हेतू स्पष्टपणे लक्षात येतो , असेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात घेडिया यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना पत्र पाठविले.
१ हजार कोटींच्या या घोटाळ्यात गुंतलेल्या बड्या राजकीय व्यक्ती लक्षात घेता केंद्रीय सहकार मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी व याची केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी करत या संदर्भात घेडिया यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *