Breaking News

आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्य अंधाराच्या खाईत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्य सरकार अंधाराच्या खाईत लोटले गेले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारावर कारवाई करावी, अशी मागणीही उपाध्ये यांनी यावेळी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या कोल इंडिया या कंपनीने ९ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेप्रमाणे हा साठा उचलावा असे कळविले होते. भुसावळ, कोराडी, चंद्रपूर  येथील औष्णिक उर्जा निर्मिती प्रकल्पांच्या व्यवस्थापकांना कोल इंडियाने पत्र पाठवून कोळशाच्या उपलब्ध साठ्याची माहिती कळवली होती. या पत्राला महाजेनकोने २१ मार्च २०२१ रोजी पत्र पाठवून राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे कळविले होते. एकीकडे लॉकडाऊन काळात मागणी वाढल्याने वीज बिलांमध्ये वाढ झाल्याचे उर्जामंत्री सांगत होते. दुसरीकडे राज्यातील विजेची मागणी घटली असल्याचे केंद्र सरकारला कळविले जात होते. यातून आघाडी सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. ऊर्जा खात्याच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्यातील जनतेला वीज टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने या बाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर राज्य सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे. राष्ट्रवादी नेतृत्वाने या घटनेबाबत अजून भाष्य केलेले नाही. राष्ट्रवादीला सत्तेचा माज आल्याचेच यातून दिसते. या घटनेबाबत शिवसेना नेतृत्व लाचारीपोटी मौन बाळगून आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले १० हजार कोटींचे पॅकेज ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण पाहता सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *