Breaking News

महाराष्ट्राच्या सत्तेची दिवास्वप्ने पाहणाऱ्या फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला ...आणि रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला!:सचिन सावंत

मुंबईः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्ष हा अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होता. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेच्या निकालावर प्रतिक्रीया देताना सचिन सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या रुपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. यातूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून आजचे निकाल हे या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे १०५ आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागणाऱ्या भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच १०५ चे १५० होतील अशा वल्गना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा भ्रमाचा भोपळा या निकालामुळे फुटला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
वर्षानुवर्षे ताब्यात भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही त्यांच्या हातून निसटला आहे. फडणवीसांकरिता वारसाहक्काच्या या मतदार संघातून त्यांचे वडील लढले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तो गड त्यांना राखता आलेला नाही. ५५ वर्षापासूनचा भाजपाचा हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडत आहेत. मतदारांनी भाजपाला नाकारले आहे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडी सरकारवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा हा सुशिक्षित मतदार बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या गर्तेत लोटलेला असून हे नरेंद्र मोदी सरकारमुळेच झालेले आहे हा त्यांचा ग्रह पक्का झालेला आहे.या सुशिक्षित मतदारांचा आक्रोश असून तो राग या मतदारांनी या निवडणुकीतून व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
मागील एक वर्षापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र द्रोहाचे काम करत आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्याबरोबर हा पक्ष वाहवत जात होता. हे लोक महाराष्ट्राचा अवमान करताना कोणतीही तमा बाळगत नव्हते. सुशांतसिह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीसांची मानहानी केली गेली. मुंबईची पाकिस्तानशी तुलना करणाऱ्या कंगना राणावतला भाजपा नेते झाशीची राणी म्हणत होते. महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा अवमान सातत्याने केला जात होता, तो रागही या निवडणुकीच्या निकालातून व्यक्त झालेला दिसला.
अमर, अकबर, अँथनीने, रॉबर्ट शेटचा पराभव केला असून भाजपाच्या परतीचा पराभव सुरु झाला आहे हे मात्र नक्की, असेही सावंत म्हणाले. भाजपाला आता भविष्यातील नामुष्की स्पष्ट दिसत असल्याने ऑपरेशन कमळला आता वेग येईल व ईडी, इन्कमटॅक्ससारख्या यंत्रणांना चवताळून मविआ नेत्यांवर सोडले जाईल, असे ते म्हणाले.

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *