Breaking News

विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस कंपनीशी भाजपची भागीदारी देवनार डंपिंग ग्राऊंडमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारातः काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
बोगस कीटकनाशके तयार करून विदर्भात ४० शेतक-यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतक-यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीशी भाजपची भागीदारी असल्यानेच या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती. तसेच देवनार डंपींग ग्राऊंड मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोप करून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस आमदार भाई जगताप आणि राजू वाघमारे उपस्थित होते.
भाजप आणि युनायटेड फॉस्फरस लिमीटेड यांच्या संबंधाचे पुरावे जाहीर करून भाजपचा पर्दाफाश केला. भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीचे स्वतंत्र संचालक आहेत. या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने या कंपनीला देवनार कचरा डेपोच्या व्यवस्थापनाचे साडेचार हजार कोटींचे कंत्राट दिले. या कामात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे भागीदार आहेत. भाजप नेत्याचे या कंपनीशी वैयक्तीक जवळीकीबरोबरच व्यावसायिक संबंध असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे या कंपनीची देयके थांबवली होती असे त्यांनी सांगितले.
शिवसेना खा. राहुल शेवाळे यांच्या आरोपानुसार ही देयके देण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे मध्यस्थी केली होती. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप केला होते असेही समजते. कचरा डेपोतील भ्रष्टाचाराचा पैसा व मध्यस्थी केल्याचा मोबदला भाजपच्या अनैतिक प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
गतवर्षी विदर्भात कापसावर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे ४० शेतक-यांचा मृत्यू झाला होता व शेकडो शेतक-यांना विषबाधा झाली होती. अनेकांना कायमचे अपंगत्व आले तर काही जणांची दृष्टी गेली होती. शेतक-यांच्या जीवावर उठलेली ही कीटकनाशके युनायटेड फॉस्फरस लिमीटेड या कंपनीने बनवली होती. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीकरिता विशेष तपास पथकाची स्थापना केली. परंतु चौकशी अहवालात आश्चर्यकारक पद्धतीने कंपनीला क्लीन चीट देऊन त्यांनीच बनवलेल्या कीटकनाशकाच्या मिश्रणाला दोषी ठरवले आणि मिश्रणावर बंदी घालण्यात आली. सरकारच्या दबावामुळेच कंपनीला क्लीन चीट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अद्याप या शेतक-यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही याचे कारण सरकारचे या कंपनीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच शेतक-यांच्या जीवावर उठलेल्या या कंपनीचा बचाव सरकारकडून सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.
सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या साथीने काल मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयावर छापा घालून भाजपच्या प्रचारसाहित्याचा अवैध फॅक्टरीचा भांडाफोड केला होता. सदर फॅक्टरीच्या कार्यालयात भाजपच्या प्रचाराचे तब्बल सहा कोटी अवैध प्रचार साहित्य सापडले होते. निवडणूक आयोगाच्या पथकाने या कार्यालयाला कालच सील केले आहे. या संपूर्ण प्रकारात काळ्या पैशाचा वापर होत असून राज्य व केंद्र सरकारकडून यंत्रणांवर दबाव येऊ शकतो त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *