Breaking News

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या दुस-या दिवशी अमरावती जिल्ह्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. त्यानंतर मोर्शी व चांदूर बाजार येथील विराट जनसंघर्ष सभेला संबोधीत करताना खा. चव्हाण यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, आ. यशोमती ठाकूर, आ. विरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस आदी नेते उपस्थित होते.

भाजप शिवसेना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कर्जमाफीची घोषणा करून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, पण अद्याप शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कर्जमाफी नाही म्हणून नविन पीक कर्ज मिळत नाही. शेतक-यांनी पीक विम्याचे हप्ते भरले पण विम्याची रक्कम काही मिळाली नाही. काही ठिकाणी विमा कंपन्यांनी शेतक-यांना १ रूपया, २ रूपये. ५ रूपये अशी भरपाई दिली. ही शेतक-यांची क्रूर थट्टा असून पीक विमा योजना शेतकरी लूट योजना झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप वाया गेले आहे. रब्बीची पेरणी झाली नाही. लोकांना प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. आता स्वतः काय खायचे? पशुधन कसे जगवायचे? या विवंचनेत शेतकरी आहेत. काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला म्हणून सरकारने दुष्काळ जाहीर केला. पण अद्याप दुष्काळी उपाययोजना सुरु केल्या नाहीत. राज्यात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. साडेचार वर्ष झाली पण मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच संपला नाही. राज्य चालवण्यात ते नापास झाल्याची टीकाही त्यांनी केली.

राज्याच्या दुरावस्थेला भाजप इतकीच शिवसेनाही जबाबदार आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे. साडेचार वर्षात काही काम केले नाही. जनतेतकडे जाऊन  मते मागायला तोंड नाही त्यामुळे आता रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरु आहे. राज्यात रोज शेतकरी मरत असताना उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या वल्गना करत आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा पब्लिसीटी स्टंट होता असा टोलाही त्यांनी लगावला. एमआयएम ही भाजपची बी टीम असून राजकीय फायद्यासाठी भाजप हिंदू, मुस्लीम आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. या कामात ओवेसी भाजपची मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

गेल्या चार वर्षात भाजप शिवसेनेने भ्रष्टाचार आणि घोटाळे करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला आहे. याच पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकून पुन्हा सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पैशाचा वापर करून लोकांना विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण आगामी निवडणुकांत विदर्भातील स्वाभिमानी जनता भाजपला पराभूत करून त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयामुळे देशातील उद्योगधंद्यांची वाताहत झाली असून बेरोजगारी वाढली आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याने करवाढ करून लोकांची लूट सुरु आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *