Breaking News

बारामतीकरांना रोखण्यासाठी भाजपात हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांना रोखण्यासाठी भाजपाकडून सातत्याने कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्याच दृष्टीकोनातून राष्ट्रवादीला खिंडार पाडत अनेक नेत्यांना भाजपात आले. आता थेट बारामती लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ल्यात हात घालत पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेस नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना भाजपात आणत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीकरांना थेट अंगावर घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार, अजित पवार यांचे राजकारणातील हाडवैर वर्षानुवर्षे आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी १९९३ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवित विजय मिळवित त्यावेळच्या भाजप-शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर झालेल्या निवडणूकीतही हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित विजय मिळविला. त्यावेळी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणून समाविष्ट झाले. २०१४ च्या निवडणूकीवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत इंदापूरमधून निवडणूक लढविली. मात्र भाजपा लाटेत त्यांना विजय मिळविता आला नाही. तरीही काँग्रेस पक्षाकडून त्यांची दखल फारशी न घेतली घेल्याने नाराज असलेले पाटील भाजपा प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.
अखेर त्या चर्चेस पूर्णविराम देत काँग्रेसला हात दाखवित भाजपाचे कमळ हातात घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपावेळी पवार कुटुंबियांनी नेहमीच इंदापूरच्या जागेवर हक्क सांगत हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर राजकिय अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच इंदापूर तालुक्यावर आपले वर्चस्व राखण्यासाठी पवारांनीही नेहमीच हर्षवर्धन पाटील यांच्या स्थानिक विरोधकांना रसद पुरविण्याचे काम केले.
यंदाच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः शरद पवार यांना रोखण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीचा भाग म्हणूनच भाजपाकडून थेट बारामतीच्या हद्दीतील हर्षवर्धन पाटील यांना भाजपात आणले आहे.
त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबियांना राजकिय अडचणीत आणण्याच्या भाजपाच्या रणनीतीला कितपत यश येते याचे उत्तर भविष्यकाळातच मिळेल.
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एक मेळावा घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याच मेळाव्यात त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्री होते. मात्र त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील आधी भाजपात आले असते तर एव्हाना खासदार झाले असते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
निष्ठेने वागायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचं कौतुकही केलं आहे. “मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही” असंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. “पक्ष देईल ती जबाबदारी मी सांभाळायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
“हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता भाजपात आल्याने भाजपाचं बळ वाढेल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर, “पाच वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची वाट बघत होतो. संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. सर्वांना सोबत घेण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. त्यांच्या गाठीशी जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भाजपाला आणि युती सरकारला मिळेल ” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *