Breaking News

चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

दर्यापूर : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याच्या तिस-या दिवसाची सुरूवात अमरावती येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. रस्त्यात गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. जनसंघर्ष यात्रा दर्यापुरातील बसस्थानक चौकात पोहोचल्यावर प्रमुख नेत्यांनी संविधानाची प्रत ठेवलेली पालखी खांद्यावर घेऊन संविधान बचाओ दिंडी काढली. या संविधान बचाओ दिंडीत हजारो नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री वसंत पुरके, आ. विरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, माजी आ. आशिष देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

खा. चव्हाण म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. लोकांना प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. अनेक भागात रब्बीची पेरणीच झाली नाही. त्यामुळे वर्ष कसे काढायचे, पशुधन कसे जगवायचे, या विवंचनेत असलेले राज्याभरातले शेतकरी चारा छावण्या सुरु करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करून दुष्काळी जनतेला दिलासा देण्याऐवजी मंत्री राम शिंदे चारा नसेल तर जनावरे नातेवाईकांकडे नेऊन सोडा, असे शेतक-यांना सांगत आहेत. त्यांचे हे वक्तव्य दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यामुळे भाजप नेते, अशी उद्दाम भाषा बोलत आहेत. जनता यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही.

शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूण विद्यार्थी, दलित, आदिवासी अल्पसंख्यांक, व्यापारी असे सर्वच घटक सरकार नाराज आहेत. वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करित आहेत. एकही समाजघटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. त्यामुळे हे सरकार कोणासाठी काम करते आहे? भ्रष्टाचा-यांना क्लीन चीट देणे एवढेच या सरकारचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

युपीए अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाहून घेऊ म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धमक्यांना काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. धमक्या दिल्यामुळे काँग्रेसचे नेते घाबरून घरी बसणार नाहीत. संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी भ्रष्ट, धर्मांध व हुकुमशाही वृत्तीच्या मोदी सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिला.

या सभेला मार्गदर्शन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचे सरकारने वाटोळे केले आहे. स्वायत्त संस्थांवर संघाशी संबंधित लोकांच्या नेमणुका करून संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदींची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे.

Check Also

नाना पटोले यांची ग्वाही, महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय

महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *