Breaking News

भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार

मुंबईः प्रतिनिधी
मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सुरु केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपाच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला.
सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांच्या बंद पडलेल्या सुत गिरणीला भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ५५ कोटींचे अर्थसहाय्य दिले होते. परंतु ही बंद पडलेली सुतगिरणी काही केल्या पुन्हा सुरु झाली नाही. तर काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याही साखर कारखान्यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा ठपका साखर आयुक्तांनी ठेवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडीक यांच्यामागे गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराचे प्रकरण मागे लावण्यात आल्याने या तीन नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रवरानगर येथील संस्थामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील पुरावे त्यांचे बंधु अशोक विखे-पाटील यांनीच सरकार दरबारी दिल्याने त्यांनीही भाजपा प्रवेशाचा रस्ता धरला आहे. माढाचे माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य शिखर बँकेतील आर्थिक घोटाळ्यात नाव आले आहे. उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थामध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सहकार आयुक्तांकडे उघडकीस आले आहे. यासह अनेक नेत्यांच्या मागे त्यांच्या सहकारी संस्थामधील भ्रष्टाचाराची प्रकरणे मागे लावली आहेत. त्या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी या सर्वांनी भाजपा प्रवेश आणि पक्षासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत मेघाभरतीत प्रवेश केलेल्या कोणत्याही नेत्याने स्वखुषीने भाजपात प्रवेश केला नाही. केवळ स्वतःवरील भ्रष्टाचाराची कारवाई टाळण्यासाठीच पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या कामासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दिमतीला खास माणसांची टीम देत ही मेघाभरती घडवून आणण्यात आली असून निवडणूकीनंतरही अशाच प्रकारची मेघाभरती घडवून आणण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

One comment

  1. सागर रामभाऊ तायडे

    छत्रपती शिवाजी महाराजाचा वैचारिक वारसा सांगुन जनतेचा आशीर्वाद घेतला आणि सत्ता आल्यावर त्यांच्या रयतेला सर्व बाजूने नागडे करून टाकले.विरोधी पक्षनेते असतांना काँग्रेस च्या विरोधात जी जी आंदोलने केली. त्या मांगणी चा आज पूर्णपणे विसर होत आहे. कुठे नेऊन ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र?.बहुजन समाजाच्या मनातील स्वराज्याची कल्पनाच मोडून काढली.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मारून टाकले आता गड किल्ले हे डोळ्यात सळतात म्हणून त्यांना ही लग्न व हनिमून हॉटेलमध्ये रूपांतर करून ऐतिहासिक इतिहास नष्ट करण्याची योजना हे पेशवा सरकार राबविण्याचा तयारीत त्यांचा निषेध करण्याची क्षमता आज मराठा समाजातील राजकिय नेत्यांत राहिली नाही. तरी फुले शाहु आंबेडकरी चळवळीतील आम्ही यांचा तीव्र निषेध करतो. त्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने करून गड किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लाऊ आणि संघर्ष करू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *