Breaking News

भाजपाच्या प्रतिविधानसभेवर विधानसभा करणार कारवाई उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

ओबीसी प्रश्नी गोंधळ झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाजावर भाजपाने बहिष्कार टाकला. त्यानंतर आज सकाळी भाजपा सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता विधानभवनाच्या पायऱ्यावर प्रति विधानसभा भरवून कामकाज करण्यास सुरुवात केली. मात्र या कृत्यावर विधानसभेत चर्चा होवून सदरप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केले.

सकाळी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकही कामकाजात सहभागी होतील अशी अटकळ सत्ताधाऱ्यांकडून बांधण्यात आली होती. मात्र विरोधकांनी सभागृहात येण्याऐवजी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून प्रति विधानसभा भरविली. त्याचे अध्यक्षपद भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालीदास कोळंबकर यांना देण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोधकांनी भाषणे दिली.

याविषयीचा प्रश्न भास्कर जाधव यांनी सभागृहात उपस्थित करत विधानभवन परिसरात प्रती विधानसभा आयोजित करण्यासाठी कोणाकडून परवानगी घेतली, तसेच लाऊडस्पीकरचा वापरही कोणत्या कायद्यान्वये करण्यात आला याविषयीचा मुद्दा उपस्थित केला. काल ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्नीही ठराव मांडण्यात आला. परुंतु विरोधकांनी कामकाजात सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे महत्वाच्या विषयावर चर्चा होवू शकली नाही.

त्यावर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रती विधानसभा आयोजित करण्यासाठी विरोधकांनी परवानगी मागितली नाही आणि तशी ती त्यांनी घेतली नाही. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव हे आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांनी कालच्या प्रकार जो काही झाला त्या घटनेवरील राग विरोधकांनी सोडून द्यावा. तसेच आज केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकातील सुधारणा विधेयक राज्य सरकारकडून सभागृहात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांनी या महत्वाच्या विषयावरील चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.

दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सदर प्रति विधानसभेचे आणि सभागृहाचे कामकाज काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रसारीत करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेत चुकीचा समज निर्माण होत आहे. हे थेट प्रेक्षपण बंद करण्याची मागणी केली.

त्यावर तालिका अध्यक्ष जाधव यांनी तसे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. मात्र मलिक यांनी तरीही प्रक्षेपण सुरु असल्याची बाब निदर्शनास आणून देताच तेथील दूरचित्रवाणी वाहिन्याचे कँमेरे हटविण्यात यावे आणि प्रक्षेपण ताबडतोब बंद करण्यात यावे असे सक्त आदेश जाधव यांनी दिले.

यावेळी मलिक यांनी आमदार नसलेले भाजपाचे नेते विधानसभा परिसरातील भाजपा आमदारांच्या आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच काही बाहेरील कार्यकर्त्येही सहभागी होत असल्याची बाब ही त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे याप्रश्नी सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकारी आणि मार्शल्स काय करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी काल उपाध्यक्षांच्या दालनात आणि दालनाबाहेर गर्दी झालेली असतानाही सुरक्षा आले नाहीत त्यामुळे या सुरक्षा अधिकारी नेमके कोणाचे ऐकतात असा सवाल उपस्थित करत त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

त्यानंतर जयंत पाटील यांनीही हाच मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, आम्हीही विरोधात असताना पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. पण कधी लाऊडस्पीकरचा वापर केला नाही. मग आता विरोधक लाऊडस्पीकर आणि माईकचा वापर कसा करत आहेत? असा सवाल त्यांनी केला.

त्यावर तालिका अध्यक्षांनी प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या विरोधकांना मार्शल्सनी बाहेर काढावे असे आदेश देण्यात आले. त्यानुसार मार्शल्सनी विरोधकांना विधानभवनाच्या पायऱ्यावरून उठविल्यानंतर विरोधकांनी विधानभवनाच्या बाहेर जावून सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरु ठेवले.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *