Breaking News

भाजपा २ ऱ्यांदा राम मंदिरासाठी घरोघरी जावून निधी गोळा करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
अयोध्या येथील राम मंदिर जन्मभूमी उभारणीसाठी १९९० साली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथ यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळीही यात्रेच्या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी, व्यापारी, दुकानदारांकडून निधी गोळा करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार असून पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन लोकांकडून मंदिरासाठी निधी गोळा करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व प्रदेश माध्यमविभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्याचे सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभानसिंह पवैय्या यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवस मुंबईत पक्षाची कोअर कमिटी, प्रदेश पदाधिकारी, मोर्चांचे अध्यक्ष इत्यादींच्या बैठका झाल्या. बैठकांमधील निर्णयांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथील भव्य मंदिरात आपला वाटा असावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे ट्रस्टच्यावतीने नागरिकांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. भाजपा निधी संकलनासाठी सक्रीय मदत करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मंदिर निर्मितीसाठी दहा दहा रुपये गोळा करतील. त्यासाठी बूथ पातळीपासून सर्वांची योजना पक्षाच्या मुंबईतील बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणूक निकालांची समिक्षा बैठकीमध्ये करण्यात आली. शेवटच्या तासात संशयास्पद रितीने मतदान वाढणे, पदवीधर नसलेल्यांची नावे मतदारयादीत असणे, खूप मोठ्या प्रमाणात कोऱ्या मतपत्रिका आढळणे असे अनेक गैरव्यवहार झाल्याचे या निवडणुकांमध्ये आढळले आहे. त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे २८ नेते आगामी तीन दिवसात राज्यभर प्रवास करणार आहेत. राज्यातील १४,५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा घेऊन निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पक्षातर्फे मदत करण्याची योजना हे नेते निश्चित करतील. राज्यात लवकरच होणाऱ्या ९२ नगरपालिका – नगरपंचायती व ५ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बैठकांमध्ये विचार झाला.

Check Also

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *