Breaking News

पक्षी मृतावस्थेत आढळतायत तर मग या क्रमांकावर फोन आणि या गोष्टी करा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत संपर्क करा- सुनिल केदार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्या मध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी नागरीकांना केले.
बर्ड फ्ल्यु रोगाबाबत दक्षता घेणे आवश्यक
केदार म्हणाले,नागरीकांनी मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४(१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैदयकाला लेखी स्वरूपात काळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा झालेला उद्रेक आहे, त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरीता राज्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित
अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत, अशी सर्व जनतेणे नोंद घ्यावी असेही श्री. केदार यांनी आवाहन केले आहे.
भोपाळ व पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणी
महाराष्ट्र राज्यातील १४ जानेवारी २०२१ रोजी, कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, लातूर ४७, गोंदिया २५, चंद्रपूर ८६, नागपूर ११०, यवतमाळ १०, सातारा ५०, त रायगड़ जिल्ह्यात ३, अशी ३३१ मृत झालेली नोंद आहे. सांगली जिल्ह्यात ३४, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात १ बगळा, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षामध्ये व वर्धा येथे ८ मोर अशा एकूण ४४ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात यवतमाळ, नंदुरबार ६. पुणे २ व जळगाव जिल्ह्यात २ अशा प्रकारे एकूण राज्यात ७ कावळ्यांमध्ये मृत आढळून आली आहेत. राज्यातील दि. १४ जानेवारी २०२१ रोजी एकूण ३८२ पक्षांमध्ये मृत झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ८ ते ७२ तास लागू शकतात, दि. ८ जानेवारी २०२१ पासून आजतागायत एकूण २३७८ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
बर्ड फ्लू पॉझीटीव्ह “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषीत
पूर्वी पाठवलेल्या नमून्याचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे) व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच मुरुंबा (ता. जि. परभणी) या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅयोजैनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच5एन1 या स्ट्रेन) करीता आणि बीड येथील नमूने (एच5एन 8 या स्ट्रेन) करीता पॉझीटीव्ह आलेले आहेत. लातूर येथील नमुनेही सकारात्मक झाल्यानुसार, सदर क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
या निर्बंधानुसार बर्ड फ्लू चा प्रादुर्भाव आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, मुरंबा (ता. जि. परभणी) येथील सुमारे 3443 व केंद्रेवाडी, ता. अहमदपूर व सुकानी जिल्हा लातूर येथील सुमारे ११०९२ कुवकट पक्षी, नष्ट करण्यात आले आहेत. तथापि, मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे), दापोली व बीड येथे केवळ सर्वेक्षण सुरु ठेवण्यात आले आहे. पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष पश्चिम विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे यांचेकडे प्राप्त एकूण ६६ नमुन्यांपैकी २२ अहवाल प्रलंबित असून ४४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुट पक्षांमध्ये ८ नमुने होकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड व नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच १३ नमुने नकारार्थी आले असून त्यात परभणी, लातूर, बीड, अकोला, अमरावती, अहमदनगर, पुणे व सोलापुर या जिल्ह्यांचा समावेश आहे. कावळ्यांचे एकूण ९ नमुने होकारार्थी आले असून त्यात मुंबई, बीड, ठाणे, रत्नागिरी, नाशिक व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे चंद्रपूर येथील एक नमुना नकारार्थी आढळून आला आहे.
मृत पक्षांचा भाग सतर्कता क्षेत्र
बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये १० नमुने होकारार्थी आढळून आले असून त्यात परभणी, लातूर, ठाणे, नाशिक, व अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच
गोंदिया, नागपूर, नाशिक, यवतमाळ व सातारा येथील नमूने नकारार्थी आढळून आले आहेत. बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००६ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मृत झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

Check Also

नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *