Breaking News

भूमीपूजन… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावरील कल्पनाधारीत कथा

दिन्या पुन्हा एकदा पेपरातले फोटो पाहू लागला . पेपराचे फाटलेले तुकडे पुन्हा पुन्हा तो जोडून जोडून रंग उडालेला चेहरा शोधत राहिला. दिन्या एका धार्मिक संस्थेचा कट्टर भक्त होता. बाबरी मस्जिद  पाडताना असंख्य विटा आपण कशा फेकल्या, किती जणांची डोकी फोडली याचा हिशोब तेंव्हापासून पोरं जनमल्या जनमल्या पोरांच्या जणू कानातच सांगायचा. त्यामुळे अख्खा इतिहास जनलोकात पाठ असायचा. दिन्याच लग्न फार काळ टिकलं नाही. दिन्याची बायको मोहल्यातला युसुफ बरोबर पळून गेल्यामुळे, दिन्या मुसलमान दिसेल तिथे त्याला शिव्या देण्याची संधी सोडायचा नाही. त्यात धार्मिक संघटनेचा भक्त असल्यामुळे हि चीड दिवसेंदिवस वाढतच गेली. घरी आई आणि तो दोघेच राहायची.

आई मुसलमानाकडे घरकाम करायला अजूनही जात असल्यामुळे तो आपल्या आईचीच आय बहिण काढायचा. पण त्याचं आईवर प्रेम हि तितकच होतं. दिन्याने फुलटायमर म्हणून धार्मिक संस्थेला वाहून घेतलं होत. तरुणपणात तसंही  त्याने बाबरी मस्जिद पाडण्यात मोलाचा वाटा उचला होता, असा त्याचा स्वतःचा समज होता. त्याची ओळख आमदारापर्यंत होती, पण मुख्यमंत्रीही आपल्यासोबत दररोज संध्याकाळी एका टेबलावर जेवायला बसल्यागत त्याचा अविर्भाव असायचा. बाजारपेठ तशी छोटी होती, त्यामुळे सलून एकच होतं. सोहेल हा मुसलमान तोही बिहारी, आणि दिन्या सुद्धा त्याच्याकडेच केस कापायचा. केस  कापता कापता मुसलमान किती नालायक आहेत हे सोहेलला सांगायचा पण इतक्या वर्षात सोहेलचा वस्तरा जराही त्याच्या गळ्यावरून फिरला नाही. सोहेल त्याची मजा घ्यायचा त्याला अजून पिसळवायचा. दिन्या तेंव्हापासून येड्यासारखा वागायला लागला, जेंव्हा त्याला कळालं कि राम मंदिर आता होणारच, तो रात्रंदिवस संघटनेच्या कामात गुंतला. तो आजूबाजूच्या गावात राम मंदिराच्या भूमिपूजनाचं पत्रक वाटायला जाऊ लागला. एकीकडे कोरोनासारखी महामारी चालू असताना देश पुन्हा एकदा राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या  चौकटीत अडकला.

सर्व न्यूज चॅनल हे आस्था चॅनेलच्या स्पर्धक वाहिन्या वाटू लागल्या. दिन्याचं स्वप्न पूरं होणार अस दिसू लागलं. दिन्याने पुन्हा एकदा आपल्या बाजारपेठेच्या चौकात राम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा कार्यक्रम लहान पोरं आणि भक्त कार्यकर्ते यांना घेऊन सुरु केला. दिन्याने अख्खी अयोध्या चौकात उतरवली. अयोध्येला जाण्याची पूर्णपणे योजना त्याने आपल्या डोक्यात आखली. दिन्या थकून रात्री उशिरा घरी आला, त्याने आईला जेवायला वाढायला उठवलं दिन्याची आई उठली नाही, तिचा श्वास बंद पडला होता. हॉस्पिटलात पोस्टमार्टमच्या अहवालात तिचा रिपोर्ट  कोरोना पॉजीटिव्ह आला.  बाजारपेठेच्या त्याच्या आसपास दिन्याच्या आईला खांदा द्यायला कोणीही पुढे यायला हिम्मत दाखवेना, धार्मिक संघटनेच्या भक्तांनी ही हिम्मत दाखवली नाही. पाच सहा तास शव तसंच पडून होत, अखेर सोहेल चार पाच पोरांना घेऊन आला. त्याच्या आईला खांदा दिला. आईच्या चितेची आग विजेपर्यंत आपल्या केलेल्या समाजाच्या कामाचा हिशोब मांडीत बसला. सोहेल त्याच्यापेक्षा वयाने जरी छोटा असला तरी आज खांदा द्यायला तोच आला. दिन्याला त्याच्या त्या गोल टोपीवर असंख्य झेंडे , फावडी, टिकाव घेऊन डोकं खंदताना दिसू लागले. दिन्याने झटकन टोपी त्याच्या डोक्यातली ओढली आणि घरचा रस्ता धरला. सोहेलला काय झालं कळेना दिन्याकडे पाहत राहिला. दिन्या दरवाजात बसून शुन्यात पाहत बसला. फावड घेऊन तडक चौकात निघाला राम मंदिराची प्रतिकृती फोडून काढली. रस्त्याने निघताना एका कार्यकर्त्याने त्याला खिडकीतूनच विचारले उद्या भूमिपूजन आहे कधी निघायचं ? दिन्या लाल झाला आणि दगड हातात उचलून त्या दगडाकडे पाहत राहिला पण बाबरी मस्जिदच्या वेळेस दगड उचलताना जी ताकद होती, त्यापेक्षा हा दगड कितीतरी त्याला जड वाटला.

Check Also

राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शालेय पध्दतीत निर्माण होणारे प्रश्न एआयसीटीईचे माजी चेअरमन डॉ.एस.एस. मंथा यांचा शालेय शिक्षण धोरणावरील खास लेख

देशातील विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील आधुनिक पध्दतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्राने नुकतेच राष्ट्रीय शिक्षण …

One comment

  1. वास्तवीकतेची जाणीव करून देणारा अप्रतिम लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *