Breaking News

विजयस्तंभाला मानवंदना देण्यास येणाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा द्या

सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सामाजिक न्याय मंत्री बडोले यांचे आदेश

पुणे : प्रतिनिधी

येथील भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येतो. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उच्च प्रतीच्या मुलभूत सोयी सेवा-सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

दरवर्षी भिमा-कोरेगांव येथील विजयस्तंभास १ जानेवारी, २०१९ रोजी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या नियोजनाचा व केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पुणे येथील विजयस्तंभाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यशदाचे महासंचालक आनंद लिमये, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशन, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयस्तंभाच्या लगतची १७ एकर जमिन कायमस्वरूपी शासनाला मिळावी यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. तसेच विजयस्तंभाच्या शेजारी इंदू मिलच्या धर्तीवर स्मारक उभारणार असल्याचेही मंत्री बडोले यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी विजयस्तंभास अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेने पार पाडावा असे सांगितले. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, पार्किंग ते विजयस्तंभ ठिकाणापर्यत प्रवासासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता व प्रकाश व्यवस्था, स्टॉलची मांडणी, अग्नीशमन यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त याचा आढावा घेऊन, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधांबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल सर्व संबधित यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल असे सांगितले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, अशी सूचना केली.

सामाजिक न्‍याय मंत्री बडोले यांनी विजय स्‍तंभ परिसराची केली पाहणी

तत्पूर्वी सामाजिक न्‍याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करून स्तंभाला मानवंदना दिली. त्यांच्यासोबत समाजकल्‍याण आयुक्‍त मिलींद शंभरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे, उपविभागीय अधिकारी ज्‍योती कदम, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक संदीप जाधव, संदीप पखाले,सर्जेराव वाघमारे, प्रादेशिक उपायुक्‍त समाजकल्‍याण संजय दाणी, राहूल डंबाळे, विशाल सोनवणे, लताबाई शिरसाट, राजीव सोनकांबळे, संतोष निकाळजे, आरती डोळस, रमेश सावंत, बबन कांबळे आदी उपस्थित होते.

Check Also

अमित शाह यांची घोषणा, सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा

संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका, ७० वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *