Breaking News

उद्धवजी, कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय?

आमदार कपिल पाटील यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

प्रति,

मा. श्री. उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख

महोदय,

बेस्ट कामगारांचा संप सुरु आहे. आज सातवा दिवस आहे. महापालिकेत आपली सत्ता आहे. महापौर शिवसेनेचा आहे. बेस्ट कमिटी आपल्या ताब्यात आहे. स्टँडिंग कमिटी आपल्याच ताब्यात आहे. बेस्ट कामगार मराठी आहेत. तरीही या संपात समेट होऊ शकलेला नाही. बेस्ट कामगारांच्या बाजूने आपण प्रशासनाला नमवाल अशी अपेक्षा होती. आशा फोल ठरली. पण कालच्या आपल्या वक्तव्याने धक्का बसला.

आपण म्हणालात, कामगारांच्या मागण्या अवाजवी आहेत. एक दिवस बेस्टच बंद पडेल.

माननीय उद्धवजी आपणास माहित असेलच, बीईएसटीचा ज्युनिअर कामगार किमान वेतनापेक्षा कमी पगार घेतो. महापालिकेच्या कंत्राटी मजुराला रुपये २१ हजार पगार आहे. बेस्टच्या ज्युनिअर गे्रडला १४ ते १५ हजार मिळतात. बेस्टच्या एकूण कामगारांमध्ये त्यांची संख्या निम्मे आहे. एकाही कामगारांची नोकरी जाणार नाही असे आपण म्हणता. पण खाजगीकरणाला संमती देता. कंत्राटीकरणाला संमती देता. हे कसं काय? खाजगीकरण आणि कंत्राटीकरण म्हणजे बेस्ट बंद करण्याची सुरुवात आहे. कंत्राटीकरण म्हणजे कामगारांच्या शोषणाला मान्यता. १४ अन् १५ हजाराच्या पगारात कर्जाचे हफ्ते जाऊन बेस्ट कामगारांनी आपल्या आईवडील आणि बायकामुलांचा संसार कसा हाकायचा? १२ तास ड्युटी करणाऱ्या कामगारांना थोड्यात भागावा आपण म्हणता. सुधारणा हव्यात पण त्या कामगारांच्या मुळावर कशाला?  पिक्चर आणि गाणी बेस्ट असतीलच पण कामगारांचं जीवन बेस्ट नाही वर्स्ट आहे. त्यात सुधारणा का करत नाहीत? त्यांचं जीवन बेस्ट का करत नाही?

बेस्ट कामगारांच्या संपाला अख्ख्या मुंबईची सहानुभूती आहे. एकही काच फुटलेली नाही. एकही टायर पंक्चर झालेला नाही. तरीही एकही बस बाहेर निघालेली नाही. इतकी अहिंसक एकजुट मुंबई कामगारांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली असेल. त्यासाठी शशांक राव आणि त्यांच्या सगळ्या सहकारी कामगारांना श्रेय द्यायला हवं. बस नसल्याने हाल होताहेत तरीही मुंबईकर शशांक राव आणि बेस्ट युनियनला दोष देत नाहीत, त्याचं हे कारण आहे. दोष पालिकेची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच जातो. महापालिका आणि बेस्टची युनियन जॉर्ज फर्नांडीस यांच्याकडे होती. त्यांचाच वारसा शरद राव यांच्याकडे होता. आता शशांक राव चालवत आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी जॉर्ज साहेबांच्या आंदोलनाला कधी मोडता घातला नव्हता. आपणकडून तीच अपेक्षा होती.

महापालिकेची तिजोरी रिकामी होईल अशी भिती आपण व्यक्त केली आहे. माननीय उद्धवजी, महापालिकेची तिजोरी बेस्ट कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार दिल्याने रिकामी होणार नाही. कामगार पगार वाढ मागत नाहीत, हक्क मागताहेत. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी झाली असेल तर ती ज्यांची सत्ता पालिकेवर चालते त्यांच्या कारभारामुळे. मुंबईच्या रस्त्यांवर भ्रष्टाचाराचे खड्डे पडले आहेत. तुमच्या गैर कारभाराने पाणी पुरवठ्याचे नळ सडले आहेत. लोक दुषित पाणी पीत आहेत. तुम्हाला कोस्टल रोड हवा आहे. पण मुंबईचे मूळ मालक, खरे भूमिपुत्र असलेल्या कोळ्यांचे वाडे आणि त्यांची समुद्र शेती उद्ध्वस्त होणार आहे, याची पर्वा नाही. कोळ्यांनी सुचवलेल्या सुधारणा तुम्ही स्विकारायला तयार नाहीत. पण बेस्ट कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या तथाकथित सुधारणा तुम्हाला हव्या आहेत.

दीड कोटीच्या इलेक्ट्रीकल बससाठी केंद्र सरकार ८० लाखांची सबसीडी देणार आहे. खाजगीकरणातून कंत्राटदारांच्या घशात ही सबसीडी का घालता? वेट लिझींगमधून प्रशासनाचे ५० कोटी रुपये सुद्धा वाचणार नाहीत. वेट लिझिंगसाठी तयार आहात पण कामगारांचा पगार द्यायला तुम्ही तयार नाही. आपण कुणाच्या बाजूने आहात? कामगारांच्या की कंत्राटदारांच्या?  गिरणी कामगार मोडून पडला. ५ लाख कामगार हद्दपार झाला. कामगारांची मुंबई आम्ही वाचवली नाही. आता मुुंबईची लाईफलाईन चालवणाऱ्या बेस्ट कामगारांना तुम्ही हद्दपार करणार आहात काय?  बेस्टचा संप आहे म्हणून रस्ते ओस पडलेले नाहीत. उलट ट्राफिक जाम आहे. बेस्टची बस सामान्यांना परवडते आणि रस्ते वाहतुकही सुरळीत होते. जगात कुठेही बस वाहतुक फायद्यात चालत नाही. अनेक मोठी शहरं तर मोफत बस सेवा देतात. तुम्हाला तर कामगारांचा पगारही महाग झाला आहे. त्यासाठी कामगारांना वाऱ्यावर सोडून बेस्ट विकणार आहात काय?

शिवसेनेकडून ही अपेक्षा नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. बेस्ट कामगारांना त्यांच्या हक्काचं देणं देऊन टाका. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई मनपाच्या मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव तातडीने सरकारकडे पाठवा. नाईट लाईफचा प्रस्ताव एका रात्रीत मंजूर होतो. बेस्ट कामगारांच्या प्रस्तावाला इतका उशीर का? उद्धवजी, सामान्य मुंबईकर हाच प्रश्न विचारतो आहे.

धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.

Check Also

राज्यात पाच टप्प्यातील निवडणूकीत इतके मतदार करणार मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात १९ एप्रिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *