Breaking News

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नाव देण्याच्या मागणीने शिवसेनेची भाजपवर कुरघोडी समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने युती करावी यासाठी एकाबाजूला भाजपकडून मिनत्या सुरु आहेत. त्यास पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यास अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. मात्र नियोजित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाला माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे घाटत असतानाच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज केली. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावावरून शिवसेनेने भाजपवर कुरघोडी केल्याचे चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.
दिवसेंदिवस राज्यातील जनतेमध्ये विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात जनमत तार होत आहे. तसेच प्रमुख राजकिय विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूका नजरेसमोर ठेवत आघाडीची बोलणी सुरु आहेत. विरोधकांच्या एकजूटीचा परिणाम भाजपच्या मतांवर होण्याच्या शक्यतेमुळे आगामी निवडणूकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपकडून वारेमाप प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी कधी मातोश्रीवर तर कधी जाहीररित्या युती करण्याचे आवाहन भाजपकडून शिवसेनेला करण्यात येत आहे.
परंतु शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने भाजपची अवस्था पिंजऱ्यात कोंडलेल्या सिंहासारखी झालेली आहे. त्यातच आज शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत समृध्दी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली.
आगामी निवडणूका आणि भाजपचे शिवसेनाप्रमुखांवरील बेगडी प्रेम या वादातच भाजपला अडकाविण्याचा डाव शिवसेनेने खेळला आहे. शिवसेनेच्या या मागणीमुळे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नाव देण्याच्या भाजपच्या राजकिय खेळीला एकप्रकारे चाप बसणार आहे. त्यामुळे अटबिहारी वाजपेयी यांचे नाव देवून राज्यातील लोकसभेच्या जागा गमवायच्या कि बाळासाहेबांचे नाव देवून शिवसेनेशी युती करायची असा यक्षप्रश्न भाजप आणि पर्यायी राज्य सरकारसमोर निर्माण झाल्याने सध्या तरी शिवसेनेने चांगलीच कुरघोडी केल्याचे दिसून येत आहे.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *