Breaking News

‘अष्टवक्र’ दाखवणार व्यवस्था आणि अपराधी यांच्यातील दुष्टचक्र तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

मुंबई : प्रतिनिधी

आजवर समाजव्यवस्था आणि राजकारण यावर भाष्य करणारे बरेच सिनेमे बनले आहेत. सद्य परिस्थितीची सत्य घटनांशी सांगड घालून बनलेले असे सिनेमे समाजमनाला आरसा दाखवण्याचं काम करतात आणि समाजामध्ये हळूहळू बदलाची नवी प्रक्रिया सुरू होते. ‘अष्टवक्र’ हा आगामी मराठी सिनेमा याच वाटचालीतील पुढचं पाऊल ठरणारा आहे.

माणसाच्या जडण घडणीत कुटुंब आणि समाज महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. आदी मानवदेखील कालांतराने कळपाने राहताना आपण आणि इतर प्राण्यांमधील वेगळेपण ओळखू लागला. मात्र आजही समाजात विकृत, मानसिक संतुलन घालवलेली माणसं जगत आहे. त्यांना अपराधी किंवा गुन्हेगार असं थोडक्यात बोलून सगळेच मोकळे होतो. पण जन्मतः अशी माणसं अपराधी म्हणून जन्माला येतात का, त्यांना या गुन्हेगारी जगात कोण आणतं? हे संस्कार कुठे होतात यासारख्या बऱ्याच गोष्टींची उकल ‘अष्टवक्र’ सिनेमात होणार आहे.

८ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अष्टवक्र’चं लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद अशी सर्वव्यापी जबाबदारी प्रदीप साळुंके यांनी सांभाळली आहे. या सिनेमाबाबत अधिक माहिती देताना दिग्दर्शक साळुंके म्हणाले की, ‘अष्टवक्र’ सिनेमाची बांधणी करण्यासाठी तब्बल ३ वर्षांचा कालावधी लागला. या काळात अथक परिश्रम घेतले गेले. त्यातून जे रसायन तयार झालं तो ‘अष्टवक्र’ हा सिनेमा आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सिनेमाचा नेमका विषय मांडणं ही तारेवरची कसरतच होती. पहिलाच सिनेमा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देत या सिनेमाचे चित्रीकरण केलं आहे. माझ्याप्रमाणे सिनेमातील इतरही  कलाकारांचा हा पहिला वहिला सिनेमा असल्यामुळे प्रत्येकाने सिनेमाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गरोदर असताना अटक झालेल्या महिला कैदींची आणि तिथेच जन्माला येणाऱ्या मुलांची ही कहाणी आहे. काहीसा दुर्लक्षित राहिलेल्या या विषयावर ‘अष्टवक्र’ सिनेमाच्या निमित्ताने दृष्टिक्षेप टाकण्यात आल्याचंही साळुंके म्हणाले.

काळजाला चटका लावून जाणाऱ्या या सिनेमाची निर्मिती वरुणराज प्रॉडक्शनचे निर्माते वरुणराज साळुंके यांनी केली आहे. सिनेमाची कथा आणि कलाकारांच्या दर्जेदार अभिनयामुळे ‘अष्टवक्र’ हा सिनेमा एक वेगळीच उंची गाठतो. विद्याधर जोशी, मयुरी मंडलिक, मंगेश गिरी, वीणा अरुण, हर्षदा बामणे, प्रीती तोरणे-कोळी आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. सिनेमाचं छायांकन विमल मिश्रा यांचं आहे, तर संकलन सुबोध नारकर यांनी केलं आहे. मयुरी मंडलिक यांनी लिहिलेल्या गीतरचना संगीतकार चंद्रोदय घोष यांनी साकार आपटे आणि गायिका रुपाली मोघे यांच्या सुमधूर आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *